• एक हजार फुटाच्या दरीत उभारली वीजवाहिनी
कोल्हापूर • प्रतिनिधी
पन्हाळा गडावरील ३३/११ के.व्ही. उपकेंद्रातून नावली व मिठारवाडी या भागाला वीज पुरवठा करणाऱ्या ११ के.व्ही. वीजवाहिन्या अतिवृष्टीने झालेल्या भुस्सखलनामुळे जमिनदोस्त झाल्या होत्या. पन्हाळगडाच्या दऱ्याखोऱ्यात महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी जीवाची बाजी लावून उंच कड्यावर वीज खांबांची वाहतूक करून एक हजार फुट खोल दरीत त्या वीजवाहिन्या उभारण्याचे काम तडीस नेले.
पन्हाळा ३३/११ के.व्ही. उपकेंद्रातून विद्युत पुरवठा करणाऱ्या ११ के.व्ही. नावली गावठाण, ११ के.व्ही. मिठारवाडी गावठाण व ११ के.व्ही. मिठारवाडी शेतीपंप या तीन वाहिन्यांचे वीज खांब व वीज तारा अतिवृष्टीने झालेल्या भुस्सखलनामुळे वाहून गेले होते. सदरच्या वाहिन्यांचा वीज पुरवठा तात्पुरत्या स्वरुपात ३३/११ के.व्ही. केर्ले व सातवे या उपकेंद्रातून सुरु करण्यात आला होता.
पन्हाळा गडावरील भौगोलिक परिस्थिती त्यात जागेची उपलब्धता, धुके व पावसामुळे पन्हाळा ३३/११ के.व्ही. उपकेंद्रातून निघणाऱ्या बाधित वीज वाहिन्यांची उभारणी करणे जिकीरीचे काम होते. खचलेला रस्ता, नागमोडी वळणाच्या पायवाटा, खडाचढ व पाऊस-वारा अशा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत ५०० किलो वजनाचा एक वीज खांब असे ५ वीज खांब व वीज तारांची वाहतूक केली. उंच कड्यावरील व दरीतील वीज खांब उभारुन वीज वाहिन्या ओढण्याचे काम पुर्ण केले.
अधिक्षक अभियंता अंकुर कावळे यांनी स्वत: स्थळ पाहणी करुन सदर कामाचे नियोजन केले. श्री. कावळे यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर ग्रामीण विभाग १ चे कार्यकारी अभियंता दिपक पाटील, उपकार्यकारी अभियंता अमोल राजे, सहाय्यक अभियंता सुलतान शेळके, कनिष्ठ अभियंता प्रविण पाटील, मुख्य तंत्रज्ञ श्री. वडांबे व जनमित्रांनी ही कामगिरी पार पाडली. या कामासाठी पन्हाळा नगरपरिषदेचे मोलाचे सहकार्य लाभले