कोल्हापूर • प्रतिनिधी
राजर्षी शाहू ब्लड सेंटरचे नवीन वास्तूत स्थलांतर झाले असून त्याचा उद्घाटन समारंभ शुक्रवारी (दि.१६) सकाळी दहा वाजता होत आहे. श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या अध्यक्षतेखाली सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते या नवीन वास्तूचे उद्घाटन होईल. यावेळी कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री व गृहराज्यमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास व कामगार मंत्री हसन मुश्रीफ आणि आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री राजेंद्र पाटील – यड्रावकर यांची प्रमुख उपस्थिती आहे, अशी माहिती राजर्षी शाहू ब्लड सेंटरचे अध्यक्ष व्ही. बी. पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी सेक्रेटरी महेंद्र परमार व डॉ. अक्षता पवार उपस्थित होते.
या कार्यक्रमप्रसंगी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचा श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे. तसेच १०० आणि १५०पेक्षा जास्त वेळा रक्तदान केलेल्या रक्तदात्यांचा प्रातिनिधिक स्वरूपात सत्कार केला जाणार आहे. राजर्षी शाहू ब्लड सेंटरचे नवीन वास्तूत स्थलांतर होत आहे. रोटरी समाजसेवा केंद्र इमारत, नागाळा पार्क, कोल्हापूर या ठिकाणी हे नवीन सेंटर आहे. केंद्र सरकारच्या नवीन धोरणानुसार ब्लड बँकेचा उल्लेख ब्लड सेंटर असा करावा लागणार असल्याने यापुढे राजर्षी शाहू ब्लड बँक ही राजर्षी शाहू ब्लड सेंटर या नावाने संबोधली जाणार असल्याचे व्ही.बी. पाटील यांनी सांगितले.
राजर्षी शाहू ब्लड सेंटर विषयी…..
१९७५ सालीकोल्हापूर येथे रक्ताची पुरेशी उपलब्धता नव्हती. त्यामुळे एखाद्या रुग्णास रक्ताची गरज किंवा ऑपरेशन करावयाचे झाल्यास त्यासाठी रक्ताची सोय मिरज किंवा मुंबई येथून त्यावेळी काचेच्या बाटलीमधून म्हणून रुग्णास द्यावे लागत असे. या परिस्थितीचा विचार करून त्यावेळी कोल्हापूर येथील डॉ. यशवंत जाधव यांनी रक्तपेढीची गरज असल्याचे ओळखले. त्यावेळी फक्त इंडियन रेड क्रॉस सोसायटी व शासकीय संस्थांना आणि विभागांना रक्तपुरवठा करण्याची परवानगी होती. त्याचा विचार करून इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्या कोल्हापुरातील शाखेच्या माध्यमातून त्यावेळचे मेडिकल ऑफिसर डॉ. डी. एम. सुळगांवकर यांच्या सहकार्याने कै. मोतीलाल दोशी, कै. डॉ. यशवंत जाधव, कै. शिवराम गद्रे व रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मेन असे ज्येष्ठ मंडळी एकत्र येऊन राजर्षी शाहू ब्लड बँक हे नवीन ट्रस्ट करण्यात आले. त्यामध्ये रोटरी समाजसेवा केंद्र, इंडियन रेडक्रॉस सोसायटी, शेतकरी सहकारी संघ, कोल्हापूर मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष व महानगरपालिका आयुक्त असे मिळून ११ जणांचे संचालक मंडळ करण्यात आले. हा ट्रस्ट शेतकरी संघाच्या जागेमध्ये रजिस्टर करण्यात आला. कोरगावकर यांनी नागाळा पार्क येथील जागा रोटरी समाजसेवा केंद्रासाठी दिली. समाजसेवा केंद्राची इमारत बांधल्यानंतर पहिल्या मजल्यावर शाहू ब्लड बँकेची सुरुवात झाली. गेली ४५ वर्षे सातत्याने कोल्हापूरमध्ये शाहू ब्लड बँक एक अग्रेसर ब्लड बँक म्हणून नावारूपास आली आहे. रोटरी समाज सेवा केंद्राच्या सहकार्याने अनेक सुविधा करण्यात आलेल्या आहेत.
वैद्यकीय क्षेत्रात अद्यावत गोष्टींचा अवलंब झाला पाहिजे. यासाठी रक्ताची चाचणी आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे करून रुग्णांना अधिक सुरक्षित रक्त देण्यासाठी कोल्हापुरात प्रथमच आधुनिक Chemiflex Technology शाहू ब्लड बँकमध्ये सुरू आहे. या यंत्रणेची किंमत ३५ लाख असून कोल्हापूर जिल्ह्यात प्रथमच रक्तामधून पसरणाऱ्या रोगांवर नियंत्रण येण्यासाठी हे मशीन अतिशय उपयुक्त आहे. सध्या टेस्टिंग करण्यासाठी दोन ते तीन तास लागतात पण या आधुनिक मशीनमुळे टेस्टिंग ३० ते ४५ मिनिटांमध्ये होऊन अचुकता वाढते.
सध्या रोटरी समाजसेवा केंद्राने बांधलेल्या नवीन इमारतीमध्ये ब्लड बँकेस ४००० स्क्वेअर फुट इतकी जागा उपलब्ध करून दिलेली आहे. यामध्ये NAT या टेस्टिंग प्रणालीचा वापर करून सुरक्षित ब्लड देण्याचा राजर्षी ब्लड बँकेचा संकल्प आहे. MSACS, NACO, SBTC या संस्थांचे ब्लड बँकेस वेळोवेळी मदत होते.
सध्या ब्लड बँकेचे अध्यक्ष व्ही.बी. पाटील असून सेक्रेटरी महेंद्र परमार व खजानिस राजीव पारिख आहेत. या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेची यशस्वी वाटचाल सुरू असून यशस्वी वाटचाल सुरू असून यामध्ये रोटरी समाजसेवा केंद्र, इंडियन रेडक्रॉस सोसायटी व शेतकरी सहकारी संघ येथील आजी व माजी पदाधिकाऱ्यांचे मार्गदर्शन लाभत आहे. राजर्षी शाहू ब्लड बँक ही सामाजिक संस्थेमार्फत समाजासाठी चालवली जाणारी ब्लड बँक असून त्याचा उद्देश समाजपसेवा करणे हाच आहे.
——————————————————- Attachments area