मॅन्युअर मॅनेजमेंट प्रोजेक्ट अंतर्गत गोकुळच्या बायोगॅस प्रकल्पाचे उद्घाटन

Spread the love


कोल्‍हापूर • प्रतिनिधी
      कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघ (गोकुळ) एन.डी.डी.बी.व सस्टेन प्लस यांच्या संयुक्त विद्यमाने मॅन्युअर मॅनेजमेंट प्रोजेक्ट अंतर्गत बायोगॅस प्रोजेक्ट कोल्हापूर जिल्ह्यातील दूध उत्पादक महिलांसाठी राबवण्यात येत आहे. या बायोगॅस प्रकल्पाचे उद्घाटन इस्पुर्ली (ता.करवीर) येथे गोकुळचे चेअरमन विश्वास पाटील यांच्या हस्ते व सर्व संचालक मंडळाच्या उपस्थितीत पार पडले.
       या प्रोजेक्ट अंतर्गत निवडक गावांमध्ये बायोगॅस बसवले असून या बायोगॅसचे वैशिष्ट असे की, या बायोगॅसला ४५ ते ५० किलो शेण प्रतिदिन व ५० लिटर पाणी मिक्स करून घालायचे. यातून तयार होणारा गॅस स्वयंपाकासाठी वापरता येतो. शेतकरी कुटुंब ५ ते ६ लोकांचे जेवण तयार होते. महिन्याच्या दीड सिलेंडरची रक्कम म्हणजे रु १५०० मासिक बचत होते. यामधून प्रतिदिनी ५० लिटर मिळणारी स्लरी गोकुळकडून सरासरी १ रुपयेप्रमाणे विकत घेतली जाणार आहे. म्हणजे रोज ५० रुपये स्लरी (द्रवरूप शेणखत) चे महिन्याला रुपये १५०० दूध उत्पादकला स्लरीपासून मिळणार आहेत. बायोगॅसमधून इंधनासाठी गॅसनिर्मिती व त्यातून बाहेर पडणारी स्लरी (द्रवरूप शेणखत) शेतीसाठी उत्तम खत म्हणून वापरता येईल. याशिवाय सर्वात महत्वाचे रासायनिक खताऐवजी या स्लरीचा वापर सेंद्रिय खत म्हणून शेतीसाठी वापर करता होईल. असा हा प्रोजेक्ट एन. डी.डी.बी अंतर्गत महाराष्ट्रामध्ये सर्वप्रथम कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पा. संघामार्फत राबवला जात आहे.
      यावेळी बोलताना चेअरमन विश्वास पाटील म्हणाले की, गोकुळने नेहमीच ग्रामीण दूध उत्पादक महिलांना केंद्रबिंदू मानून नेहमीच महिला दूध उत्पादकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. गोकुळने सातत्याने दूध उत्पादक महिलांसाठी दूध व्यवसायाचे प्रशिक्षणातून मार्गदर्शन करून किफायतशीर दूध व्यवसाय करण्यासाठी विविध सेवासुद्धा पुरवल्या जातात. गोकुळ दूध संघ, एन.डी.डी.बी. व सस्टेन प्लस यांच्या संयुक्त विद्यमाने मॅन्युअर मॅनेजमेंट प्रोजेक्ट अंतर्गत ग्रामीण महिलांना पशुपालन व्यवसायामधून दूध उत्पादनाबरोबरच चांगल्याप्रकारे घरगुती वापरासाठी इंधन व शेतीसाठी सेंद्रिय खत मिळणार असून महिला दूध उत्पादकांना आर्थिक फायदा होणार आहे.
      या कार्यक्रमा अंतर्गत चुये, वडकशिवाले, कावणे, निगवे खालसा, इस्पुर्ली, येवती, म्हाळुंगे, बाचणी या ठिकाणी १२० बायोगॅस बसवण्यात आले असून या लाभार्थीचे प्रशिक्षण शिबीराचे आयोजन चुये (ता. करवीर) येथे करण्‍यात आले होते.
      या कार्यक्रमाचे स्‍वागत गोकुळचे संचालक शशीकांत पाटील-चुयेकर यांनी केले. प्रोजेक्ट माहिती सौ. निता कामत यांनी दिली. जेष्‍ठ संचालक अरूण डोंगळे, संचालक अजित नरके, एन.डी.डी.बी.चे अधिकारी निरंजन कराडे यांनी मनोगत व्यक्त केले. आभार इस्पुर्ली येथे महिला दूध उत्पादक सौ. छाया दिलीप कुराडे यानी मानले.
      यावेळी संघाचे संचालक नंदकुमार ढेंगे, प्रकाश पाटील, बयाजी शेळके, बाळासो खाडे, संचालिका श्रीमती अंजना रेडेकर, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले, एन.डी.डी.बी.चे श्री. पटेल, सस्टेन प्लसचे धर्मेंद्रकुमार, सिस्टीमाचे अधिकारी, गोकुळच्या महिला नेतृत्‍व अधिकारी सौ.निता कामत,संघाचे अधिकारी, महिला दूध उत्पादक, इस्पुर्लीचे ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!