• आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते उद्घाटन
कोल्हापूर • प्रतिनिधी
राजर्षी शाहू ब्लड सेंटरचे नवीन वास्तूत स्थलांतर झाले असून त्याचा उद्घाटन समारंभ शुक्रवारी (दि.१६) सकाळी दहा वाजता होत आहे. श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या अध्यक्षतेखाली सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते या नवीन वास्तूचे उद्घाटन होईल. श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या उद्घाटन सोहळ्यास कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री व गृहराज्यमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास व कामगार मंत्री हसन मुश्रीफ आणि आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री राजेंद्र पाटील – यड्रावकर यांची प्रमुख उपस्थिती आहे, अशी माहिती राजर्षी शाहू ब्लड सेंटरचे अध्यक्ष व्ही. बी. पाटील व सेक्रेटरी महेंद्र परमार यांनी दिली.
या कार्यक्रमप्रसंगी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचा श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे. तसेच १०० आणि १५०पेक्षा जास्तवेळा रक्तदान केलेल्या रक्तदात्यांचा सत्कार केला जाणार आहे. केंद्र सरकारच्या नवीन धोरणानुसार ब्लड बँकेचा उल्लेख ब्लड सेंटर असा करावा लागणार असल्याने यापुढे राजर्षी शाहू ब्लड बँक ही राजर्षी शाहू ब्लड सेंटर या नावाने संबोधली जाणार असल्याचे व्ही.बी. पाटील यांनी सांगितले.
राजर्षी शाहू ब्लड सेंटरचे नवीन वास्तूत स्थलांतर होत आहे. रोटरी समाजसेवा केंद्र इमारत, नागाळा पार्क, कोल्हापूर या ठिकाणी हे नवीन सेंटर आहे. अनेक अत्याधुनिक सुविधा या सेंटरमध्ये करण्यात आल्या आहेत. प्रशस्त व सुविधांनी युक्त अशा या नवीन सेंटरचे उद्घाटन होईल. हा समारंभ कोविड निर्बंधांमुळे काही मोजक्या लोकांच्या उपस्थितीत होणार आहे.