कोल्हापूर • प्रतिनिधी
कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील गडमुडशिंगी गावातील जिल्हा परिषदेच्या कुमार व कन्या विद्या मंदिर शाळेच्या नूतन इमारतीसाठी लागणारा निधी लवकरात लवकर उपलब्ध करून देण्याची ग्वाही शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी आमदार ऋतुराज पाटील यांना दिली आहे. या शाळेचा समावेश ‘आदर्श शाळा योजने’त करण्याची विनंती आमदार पाटील यांनी यावेळी केली.
कुमार व कन्या विद्या मंदिर शाळेच्या जुन्या झालेल्या इमारतीच्या नूतनीकरणासाठी आवश्यक निधीबाबत आमदार ऋतुराज पाटील यांनी बुधवारी (दि.१३) शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची मुंबईत भेट घेतली. १९५४ साली बांधकाम झालेल्या या इमारतीच्या निर्लेखनाचा निर्णय झाला आहे. नव्या इमारतीसाठी सर्व सुविधायुक्त विस्तृत आराखडा तयार करण्यात आला असून यासाठी लागणारा निधी लवकरात लवकर उपलब्ध करून देण्याची विनंती आमदार पाटील यांनी यावेळी केली. तसेच या शाळेचा समावेश शासनाच्या आदर्श शाळा योजनेत करण्यात यावा अशी विनंतीही त्यांनी केली. या दोन्ही मागण्याना शालेय शिक्षणमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
गडमुडशिंगी कुमार व कन्या विद्या मंदिर ही शाळा जिल्ह्यातील सर्वाधिक पटसंख्या असलेली जिल्हा परिषदेची शाळा आहे. साडेतीन एकर परिसर लाभलेल्या या शाळेत सध्या सुमारे बाराशे विद्यार्थी आहेत. ३६ वर्गखोल्या व अन्य सोयीसुविधायुक्त आठ खोल्याची नवी शाळा इमारत प्रस्तावित आहे