• दालन २०२२ प्रदर्शनाचे उत्साहात उद्घाटन
कोल्हापूर • प्रतिनिधी
कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीसाठी एकाचवेळी सर्व गावांचा समावेश करू नका. जिल्ह्यातील दोन्ही मंत्र्यांनी जनतेचे मत घेऊन व शेतीप्रधान गावांचा विचार करूनच हा निर्णय घ्यावा. नागरीकरण झालेल्या गावांचा प्राधान्याने हद्दवाडीत समावेश करावा. शेतीप्रधान गावांना बाजूला ठेवून नागरीकरण झालेल्या गावांचा विचार हद्दवाढीसाठी सुरू करा, असा सल्ला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला.
क्रिडाई आयोजित दालन २०२२ या वास्तू व बांधकाम विषयक प्रदर्शनाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत उत्साहात उद्घाटन झाले. याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पालकमंत्री सतेज पाटील होते. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, खासदार संजय मंडलिक, आमदार ऋतुराज पाटील यांची उपस्थिती होती.
बांधकाम व्यावसायिकांचे प्रश्न सोडवू. मध्यम व गरीब वर्गातील लोकांसाठी घरे उपलब्ध करण्यासाठी क्रिडाईने पुढाकार घ्यावा. तुम्हाला चांगल्या सुविधा हव्या असतील तर त्याबरोबर कठोर भूमिकाही घ्यावी लागणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. सर्वांना एकत्र व विश्वासात घेऊनच कोल्हापूरचा विकास होईल, यासाठी मी तुमच्या पाठीशी असून तुम्हाला लागेल तेवढा निधी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी माझी राहील असा विश्वासही त्यांनी यावेळी दिला.
पालकमंत्री सतेज पाटील म्हणाले की, कोल्हापूर आता विकसित शहर म्हणून पुढे येत आहे. बांधकाम क्षेत्रामुळे कोल्हापूर आता कोकणशी जोडले जात आहे. यामुळे कोल्हापूरचा विकास होणार असून यासाठी अनेक योजना आपण आणल्या असल्याचे त्यांनी सांगितले.
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी बांधकाम कामगारांसाठी कल्याणकारी मंडळ उभा करून त्यांच्यासाठी अनेक योजना आणल्याचे सांगितले. कामगारांसाठी क्रिडाईने सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक क्रिडाई कोल्हापूरचे अध्यक्ष विद्यानंद बेडेकर यांनी केले. यावेळी त्यांनी बांधकाम व्यावसायिकांच्या अडचणी मांडल्या. क्रिडाई दालनचे अध्यक्ष प्रकाश देवलापूरकर यांनी दालन प्रदर्शनाचा आढावा घेतला. प्रदीप भारमल यांनी आभार मानले. यावेळी उद्योजक व्ही.बी.पाटील, क्रिडाई कोल्हापूरचे उपाध्यक्ष चेतन वसा, सचिव प्रदीप भारमल, गौतम परमार, सोमराज देशमुख, अजय डोईजड संदीप मिरजकर यांच्यासह क्रिडाईचे पदाधिकारी, सभासद व प्रायोजक उपस्थित होते.
——————————————————-
![]() | ReplyForward |