व्यापार, उद्योग, कृषी क्षेत्राच्या विकासासाठी वाहतुकीचा खर्च कमी करून निर्यात वाढवा: मंत्री नितीन गडकरी

Spread the love

• महाराष्ट्र चेंबरचे ४०वे अध्यक्ष ललित गांधी पदग्रहण समारंभ
कोल्हापूर • प्रतिनिधी
     जगात भारत व देशात महाराष्ट्र राज्याची अर्थव्यवस्था सर्वात अधिक गतीने वाढत आहे. निर्यात वाढवून आयात कमी करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे. महाराष्ट्र राज्याच्या विकासासाठी व व्यापार, उद्योग, कृषी क्षेत्राचा विकास करण्यासाठी वाहतुकीसाठी होणारा खर्च कमी करणे आवश्यक आहे. महाराष्ट्र चेंबरने राज्याच्या विकासासाठी महत्वाचे योगदान दिले आहे. येणारा काळ इलेक्ट्रिक वाहनांचा असेल. इथेनॉलचा वापर मोठ्या प्रमाणात होणार असून शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल. महाराष्ट्र चेंबरने राज्याचा जिल्हावार अभ्यास करून महाराष्ट्रच्या विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार करून द्यावी व महाराष्ट्र चेंबरचे नुतन अध्यक्ष ललित गांधी निश्चितच महाराष्ट्राच्या विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार करून त्यावर काम करतील याची खात्री असल्याचे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी  यांनी केले.
      चेंबरच्या प्रथेप्रमाणे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते अध्यक्षीय ट्रॉफी देऊन नूतन अध्यक्ष ललित गांधी यांचे पदग्रहण करण्यात आले. 
      महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँण्ड अग्रिकल्चरच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण समारंभ व अर्थसंकल्पानंतर महाराष्ट्रातील विकासाची नवी दिशा याविषयावर परिषद व मार्गदर्शन असा संयुक्त कार्यक्रम केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी व केंद्रीय वित्त राज्यमंत्री भागवत कराड यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी (दि.५) मुंबई येथे संपन्न झाला.
     सुरवातीला महाराष्ट्र चेंबरचे ४० वे अध्यक्ष कोल्हापूर येथील प्रसिद्ध उद्योजक ललित गांधी यांनी चेंबरच्या महोत्सवी वर्षापर्यंतच्या ६ वर्षांची ब्ल्यू प्रिंट सादर केली. ज्यामध्ये महाराष्ट्राच्या ६ विभागासाठी ६ महिला उद्योजिका क्लस्टर, कृषिपूरक उद्योगांचे क्लस्टर व उत्पादन आधारित उत्पादनांचे ६ क्लस्टर चेंबरच्या पुढाकाराने उभारण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी केली. तसेच चेंबरतर्फे सभासद व सहयोगी सभासद संस्थांच्या सभासदांना व्यापार विकासासाठी वेबसाईट व डिजिटल प्लॅटफॉर्म मोफत उपलब्ध करून आहे. तसेच चेंबरतर्फे उत्पादक ते विक्रेता अशा व्यापार वृद्धीसाठी व सभासदांच्या व्यापार वृद्धीसाठी लवकरच अँप उपलब्ध करून देणार असल्याचे अध्यक्ष ललित गांधी यांनी सांगितले.
     केंद्रीय वित्त राज्यमंत्री भागवत कराड यांनी देशाच्या अर्थसंकल्पात विकासाच्या अनेक योजना केंद्र सरकारने जाहीर केल्या आहेत. आजादी का अमृत महोत्सव साजरे करत असतांना पुढचे २५ वर्षांचा काळ हा अमृत काळ असेल. त्यादृष्टीने सरकारने काम सुरु केले आहे. क्रिप्टो करन्सीला सरकारने मान्यता दिलेली नाही त्यावर ३० टक्के कर आकारण्यात आल्याचे सांगितले. देशात ७५ डिजिटल बँक सुरु करण्यात येत आहे. डिजिटल करन्सी आल्यावर पारदर्शकता येईल. भ्रष्टाचार संपुष्टात येईल. राज्याच्या व देशाच्या विकासासाठी केंद्र सरकारच्या योजना समजून घ्या व त्याचा प्रचार प्रसार करून सर्वांना त्याचा फायदा मिळण्यासाठी योजनांची अंमलबजावणी करा. राज्याच्या व्यापार, उद्योग, कृषी क्षेत्राच्या विकासासाठी एकत्र येऊन काम करू असे प्रतिपादन डॉ. भागवत कराड यांनी केले.
      माजी वस्त्रोउद्योग मंत्री प्रकाश आवाडे व माजी मंत्री राज के. पुरोहित यांनीही मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी व्यासपीठावर महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, केंद्रिय वित्त राज्य मंत्री डॉ. भागवत कराड, वरिष्ठ उपाध्यक्ष उमेश दाशरथी, विश्वस्त मंडळाचे चेअरमन आशिष पेडणेकर, उपाध्यक्ष करुणाकर शेट्टी, उपाध्यक्ष रवींद्र माणगावे, माजी अध्यक्ष संतोष मंडलेचा उपस्थित होते. 
     यावेळी नूतन पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य व तज्ञ समिती चेअरमन, वरिष्ठ उपाध्यक्ष उमेश दाशरथी, उपाध्यक्ष करुणाकर शेट्टी, उपाध्यक्षा सौ. शुभांगी तिरोडकर, उपाध्यक्ष रवींद्र माणगावे, उपाध्यक्ष सुधाकर देशमुख, उपाध्यक्ष चंद्रशेखर पुनाळेकर यांचा सत्कार अध्यक्ष ललित गांधी, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, केंद्रियवित्त राज्य मंत्री डॉ. भागवत कराड आदींच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सत्कार केला. 
     सूत्रसंचालन उपाध्यक्ष रवींद्र माणगावे यांनी तर आभार प्रदर्शन उपाध्यक्ष करुणाकर शेट्टी यांनी मानले. कार्यक्रमास  विश्वस्त खुशालचंद्र पोद्दार, माजी अध्यक्ष शंतनु भडकमकर, प्रभारी सरकार्यवाह सागर नागरे, सचिव विनी दत्ता, कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते.
——————————————————

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!