ट्रेसिंग, टेस्टिंग आणि सर्व्हेक्षण वाढवण्यावर भर द्या: पालकमंत्री

Spread the love


कोल्हापूर • (जिमाका) 
     कोरोना प्रतिबंधासाठी ट्रेसिंग, टेस्टिंग आणि सर्व्हेक्षण वाढवण्यावर भर द्या. ज्या अधिकारी-कर्मचारी यांची नोंदणी लसीकरणासाठी झालेली आहे, त्यांचे लसीकरण शुक्रवारपर्यंत होण्याची जबाबदारी त्या-त्या विभाग प्रमुखांच्यावर आहे, असे निर्देश पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज दिले.
     जिल्हाधिकारी कार्यालयातील राजर्षी छत्रपती शाहू सभागृहात कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना व नियोजनासाठी सर्व प्रांताधिकारी, पोलीस उपअधिक्षक, तहसिलदार, गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, पोलीस अधिकारी, मुख्याधिकारी यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरंसिंगव्दारे बैठक घेण्यात आली. या बैठकीला आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, आमदार प्रकाश आवाडे, जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, अप्पर जिल्हाधिकारी किशोर पवार, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलंडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, जिल्हा शल्यचिकित्स्क डॉ. अनिल माळी, अधिष्ठाता डॉ. एस.एस.मोरे आदी उपस्थित होते.
      पालकमंत्री श्री. पाटील यावेळी म्हणाले, विदर्भात रूग्ण संख्या वाढते. पूर्वतयारी म्हणून आपल्यालाही सतर्क रहावे लागेल. उपलब्ध असणाऱ्या साधनसामुग्री यंत्रणा कार्यान्वित करण्याबाबत सर्वांनी दक्षता घ्यावी.  सुस्थितीत ठेवण्याबाबत नियंत्रण करावे. प्रत्येक तालुक्यात एक कोव्हिड काळजी केंद्र सुरू करता येईल याबाबत तयारी ठेवावी. पुन्हा एकदा सर्व्हेक्षणावर भर द्यावा. त्याचबरोबर कॉन्टॅक्ट ट्रेसिंग आणि टेस्टिंग वाढवण्यावरही भर हवा. प्रमुख शहरातील खासगी लॅबवर लक्ष देणं आवश्यक आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी आणि जिल्हा शल्य चिकित्सक यांनी या लॅबला भेटी द्याव्यात. आतापर्यंत सर्वांनी मिळून चांगले काम केले आहे, यापुढेही करूया, त्यासाठी सर्वांनी दक्षता बाळगूया, असेही ते म्हणाले.
      लसीकरणासाठी नोंदणी झालेल्या फ्रंटलाईन वर्कर्सचे शुक्रवारपर्यंत १०० टक्के लसीकरण व्हायला हवे. त्याची जबाबदारी संबंधित विभाग प्रमुखांवर राहील. जे लसीकरण घेणार नाहीत त्यांच्या नावासह खुलासा विभाग प्रमुखांनी सादर करावा, असेही पालकमंत्री म्हणाले.
      विना मास्क असणाऱ्यांवर पोलीस आणि महसूल यंत्रणेने कारवाई करावी. विना मास्क असणाऱ्यांना दुकानदारांनी प्रवेश देऊ नये. आपण सर्वांनीही मास्कचा वापर, सामाजिक अंतर आणि सॅनिटायझरचा वापर या त्रिसुत्रीचा वापर करावा. स्वत:हून लोकांनी उपाययोजना करावी, नियमांचे पालन करावे, असे आवाहन पालकमंत्री श्री. पाटील यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!