कोविड चाचण्यांसाठी गावनिहाय आराखडा तयार करुन तपासण्या वाढवा: जिल्हाधिकारी

Spread the love


कोल्हापूर • (जिल्हा माहिती कार्यालय)
     जिल्ह्यातील कोरोनाचा रुग्णदर व मृत्युदर कमी होण्यासाठी गावनिहाय आराखडा तयार करावा, चांगले काम करीत असलेल्या ग्रामसमित्या व सरपंच यांचे अनुकरण इतर गावांनी करावे, ग्रामस्तरीय अलगिकरण कक्ष स्थापन करावेत, तसेच तपासण्या वाढवून बाधित रुग्णांना वेळेत उपचार मिळवून द्यावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिले.
     जिल्हाधिकारी कार्यालयात आज जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना नियंत्रणासाठी नियुक्त केलेल्या सर्व पथक प्रमुखांची बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, अपर जिल्हाधिकारी किशोर पवार, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अनिल माळी तसेच सर्व पथक प्रमुख उपस्थित होते. तर सर्व उपविभागीय अधिकारी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे उपस्थित होते.
     कोरोनाची रुग्ण संख्या, मृत्यदर, तपासण्यांची सद्यस्थिती, लसीकरण, नवीन ऑक्सिजन जनरेशन प्लांट,  हॉस्पिटल ऑडिट, कोविड केंद्राची तपासणी व सुविधा, महाआयुष सर्व्हे, ६० वर्षे वयावरील नागरिकांचे प्राधान्याने लसीकरण पूर्ण करणे, आदी विविध विषयांचा तालुकानिहाय आढावा जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी घेतला.
     जिल्हाधिकारी श्री. देसाई म्हणाले, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी अँटीजन किट्स चे योग्य प्रमाणात वाटप करावे. किमान १५ दिवसांचा औषधांचा साठा प्रत्येक शासकीय कोविड केंद्रात असेल याप्रमाणे नियोजन करावे, औषधे शासनाकडून मागविणे किंवा स्थानिक रित्या खरेदी करणे याचे योग्य नियोजन करावे. कोरोनाची वाढती रुग्णसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, मुख्याधिकारी, गट विकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी यांनी सूक्ष्म नियोजन करुन त्यानुसार अंमलबजावणी करावी. हातकणंगले, शिरोळ, करवीर अशा रुग्णदर अधिक असणाऱ्या तालुक्यातील अधिकाऱ्यांनी नियोजनबद्ध उपाययोजना राबवाव्यात. महा आयुष सर्व्हे अंतर्गत लक्षणे आढळणाऱ्या ६० वर्षावरील नागरिकांची तात्काळ तपासणी करुन घेवून बाधित नागरिकांना वेळेत उपचार मिळवून द्या,  या सर्व्हेचे काम गतीने पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिल्या.
     कोविड केअर सेंटर व कोविड सेंटरमध्ये किमान १५ दिवस पुरेल इतका औषध साठा उपलब्ध ठेवा. याठिकाणी आवश्यक त्या वैद्यकीय सेवा – सुविधा, स्वच्छता, औषधसाठा असल्याची तपासणी वेळोवेळी करावी. रुग्णालयांच्या फायर, इलेक्ट्रिक, ऑक्सिजन ऑडिट मध्ये आढळून आलेल्या त्रुटींची तात्काळ पूर्तता करुन घ्यावी, अशा सूचना देऊन जिल्हाधिकारी दौलत देसाई म्हणाले, ऑक्सिजन पुरवठा सुरळीत सुरु राहण्याच्या दृष्टीने ऑक्सिजन जनरेशन प्लॅन्ट ची कामे जलदगतीने पूर्ण करुन घ्यावीत. पूर परिस्थितीमुळे बाधित होणाऱ्या भागातील ज्येष्ठ नागरिक व मदतकार्यात सहभागी नावाडी व रेस्क्यू फोर्सचे तरुण यांचे लसीकरण प्राधान्याने करुन घ्यावे, असे सांगून कोरोना नियंत्रणासाठी सर्व अधिकाऱ्यांनी व्यक्तिशः प्रयत्न करावेत, अशा सूचना जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिल्या.
     सर्व पथकप्रमुखांनी राबविण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती दिली.
———————————————– Attachments area

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!