गोकुळ’च्‍या कर्मचाऱ्यांना ९ कोटी ६० लाख पगारवाढ


कोल्‍हापूर • प्रतिनिधी
     संघ व्‍यवस्‍थापन व कर्मचारी संघटना यांच्‍यातील १२ व्‍या त्रैवार्षिक कराराची बैठक दि.११ डिसेंबर रोजी  झाली. पगारवाढीच्‍या संदर्भाने व्‍यवस्‍थापन व कर्मचारी संघटना यांच्‍यातील खेळीमेळीच्‍या चर्चेतून कर्मचाऱ्यांना ९ कोटी ६० लाख इतकी भरीव पगारवाढ व्‍यवस्‍थापन मंडळाने दिली. ही पगारवाढ दि.३० जून २०२० रोजी असणाऱ्या २०४५ इतक्‍या कायम कर्मचाऱ्यांना प्रत्येकी सरासरी रुपये ३९००/- इतकी झाली आहे.
      संपूर्ण जगात कोरोनाच्‍या पार्श्‍वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन असल्‍याने उद्योगधंदे अडचणीत आले असून, आर्थिक उलाढाल थांबली असतानासुद्धा गोकुळचे नेते आमदार पी.एन.पाटील व माजी आमदार महादेराव महाडिक यांच्‍या नेतृत्‍वाखाली चेअरमन रविंद्र आपटे यांनी लॉकडाऊनच्‍या काळात सुयोग्‍य नियोजन करून ५ लाख दूध उत्‍पादक शेतकरी,कर्मचारी व ग्राहक यांच्‍यात समन्‍वय साधत अविरत दूध संकलन,प्रक्रिया व वितरण याचे चांगले नियोजन करून गोकुळचे आर्थिक चक्र गतिमान ठेवले.आठ महिन्‍यांच्‍या लॉकडाऊनमध्‍ये संपूर्ण जग थांबले असताना गोकुळचे कामकाज नियमीत ठेवण्‍यामध्‍ये सर्व संचालक मंडळ,कर्मचारी,वितरक व ग्राहक यांनी जिवाची बाजी लावून काम केले आहे. त्‍यामुळेच लक्षावधी दूध उत्‍पादकांना कोरोनाच्‍या काळात कोणतीही आर्थिक झळ बसू न देण्‍याचा मोठा प्रयत्‍न संघ व्‍यवस्‍थापन व कर्मचारी यांनी केला त्‍याचेच फळ म्‍हणून ही पगारवाढ म्हणण्‍यास हरकत नाही.
     गोकुळचे चेअरमन रविंद्र आपटे, माजी चेअरमन व जेष्‍ठ संचालक अरुण नरके, रणजितसिंह पाटील, विश्‍वास पाटील, अरुण डोंगळे, संचालक विश्‍वास जाधव, पी.डी.धुंदरे, बाळासो खाडे, कार्यकारी संचालक डी.व्‍ही.घाणेकर यांनी बैठकीमध्‍ये संघटना प्रतिनिधींशी सौहार्दपुर्ण चर्चा केली.त्‍यामुळे व्‍यवस्‍थापनाने देवू केलेल्‍या पगारवाढीस संघटना प्रतिनिधींनी होकार देवून संचालक मंडळास सन्‍मान दिला. कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी अध्‍यक्ष कॉ. एस. बी.पाटील,उपाध्‍यक्ष संजय सावंत, जनरल सेक्रेटरी संजय सदलगेकर, शंकर पाटील, शाहीर निकम, व्ही. डी. पाटील, मल्‍हार पाटील, संभाजी देसाई, लक्ष्‍मण पाटील, संग्राम मगदूम यांनी गोकुळच्‍या हिताला बाधा न आणता दिलेली साथ हीच कराराची यशस्‍वीता आहे असे आभाराप्रत सांगितले. संचालक मंडळाच्‍या निर्णयास कर्मचारी संघटनेच्‍या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्‍या मोलाच्‍या सहकार्याबद्दल चेअरमन रविंद्र आपटे यांनी धन्‍यवाद दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *