• २६ ते २८ मार्च २०२२ रोजी कोथरूड येथे ट्रेड शोचे आयोजन कोल्हापूर • प्रतिनिधी इंडो थाय ट्रेड शो २६ ते २८ मार्च २०२२ या कालावधीत कोथरूड – पुणे येथे आयोजित करण्यात आला असल्याची माहिती थायलंडच्या वित्त मंत्रालयाचे वाणिज्य सल्लागार चेतन अरुण नरके यांनी पत्रकार परिषद दिली. यावेळी गोकुळचे माजी अध्यक्ष अरूण नरके उपस्थित होते. याविषयी अधिक माहिती देताना चेतन नरके म्हणाले की, मार्चमध्ये होत असलेल्या इंडो थाय ट्रेड शोमध्ये दोन्ही देशामधील उदयोजकांना उद्योग संधी उपलब्ध करून देण्यावर भर दिला जाणार आहे. यातून आर्थिक, बौद्धिक गुंतवणुकीसह रोजगार आणि उद्योगाच्या नवनवीन संधी निर्माण होणार आहेत. अशाप्रकारचे ट्रेड शो देशातील विविध भागात आयोजित केले जाणार आहेत. दोन्हीही देशातील ग्रामीण आणि आदिवासी क्षेत्रात आणि महिलांच्याकडून तयार केलेल्या आणि हस्तकला, शिल्पकला, लाकडी वस्तू , धातूच्या वस्तू , कपडे विशिष्ट प्रकारची खेळणी इत्यादी वस्तूंची प्रदर्शने आणि कायमस्वरूपी विक्री व्यवस्था निर्माण करण्यासाठी प्रयत्न सुरु आहे. येणाऱ्या काळात नृत्य आणि संगीतासह विविध लोककलांचा समवेश असणारे सांस्कृतिक महोत्सव दोन्ही देशात आयोजित करण्याचे नियोजन सुरु आहे. यामुळे दोन्ही देशातील ग्रामीण कला आणि कलात्मक वस्तूंना जागतिक बाजारपेठ मिळण्यासाठी फायदा होणार आहे. ते म्हणाले की, १९४७ मध्ये भारतासोबत राजनैतिक संबंध प्रस्थापित करणारा थायलंड हा पहिला आशियाई देश होता. या दोन देशामधील आर्थिक आणि सांस्कृतिक संबंध २००० वर्षाहून अधिक जुने आहेत. धार्मिक आणि सांस्कृतिक समानतेमुळे मैत्रीचा पाया घट्ट होत सर्वच पातळीवरील संबंध खोलवर रुजले गेले आहेत. थायलंडमधील ९४ % लोकसंख्या बौद्ध धर्मीय आहे. देशात हिंदू संस्कृतीचा प्रभाव प्रामुख्याने जाणवतो. हिंदू मंदिरांची संख्याही बौद्ध मंदिरां इतकीच आहे. संगीत नृत्य आणि इतर कला तसेच सांस्कृतिक प्रकारात दोन्ही देशात बऱ्याच प्रमाणात समानता आढळते. या सर्व गोष्टी दोन्ही देशांना राजकीय, आर्थिक, सांस्कृतिकदृष्ट्या जवळ आणण्यास आणि दोन्ही देशांमध्ये एक नैसर्गिक आकर्षण निर्माण करण्यास कारणीभूत ठरतात. भारत आणि थायलंड दरम्यान सध्यस्थितीत १२.५ बिलिअन डॉलरचा व्यवसाय होत आहे. भविष्यात यामध्ये मोठी वाढ होण्याचे संकेत आहेत. कोविड-१९ महामारी आणि आर्थिक मंदीतही थायलंड आणि भारत यावर्षाच्या पहिल्या १० महिन्यांत ५६ % द्विपक्षीय व्यापार वाढ झाली आहे, ही खूपच सकारात्मक बाब आहे. पुढीलवर्षी एशिया पॅसिफिक इकॉनॉमिक कोऑपरेशन किंवा APEC शिखर परिषदेचे यजमानपद थायलंडकडे आहे. याचाही फायदा थायलंड आणि भारत यांच्यातील व्यापार संबंधांसाठी होईल. थायलंडने औद्योगिक वाढीसाठी EEC ( इस्टर इकॉनॉमिक कॉरिडॉर ) विकसित केला आहे. ज्यामुळे भारताला थायलंडमध्ये उत्पादन केंद्रे सुरु करून दक्षिण पूर्व आशियासाठी मोठा पुरवठादार होण्याची मोठी संधी आहे. भारताचे धोरण ॲक्ट इस्ट आणि थायलंडचे धोरण लुक वेस्ट जे एकमेकांना पूरक आहे. चीन आणि अमेरिकेचे बिघडलेले व्यापारी संबंध आणि जागतिक पातळीवरील राजकीय घडामोडीचा फायदा थायलंड आणि भारताच्या एकत्रित आर्थिक विकासासाठी संधी निर्माण करणारा आहे, अशी माहितीही चेतन नरके यांनी दिली. ——————————————————- Attachments areaReplyForward