खाशाबा जाधव यांच्या जयंतीनिमित्त आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा सत्कार

Spread the love

 
कोल्हापूर • प्रतिनिधी
      स्वतंत्र भारताचे पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक विजेते स्वर्गीय खाशाबा जाधव यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्यावतीने ऑलिम्पिक स्पर्धेच्या निवड चाचणीसाठी पात्र ठरलेल्या व शासनाचे अनुदान मिळालेल्या आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा सत्कार करण्यात आला.
       भवानी मंडप परिसरातील किर्तीस्तंभाला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. जिल्हाधिकारी दौलत देसाई, जिल्हा क्रीडाधिकारी डॉ. चंद्रशेखर साखरे यांच्या हस्ते ऑलम्पिक निवड चाचणीसाठी पात्र ठरलेले खेळाडू श्रीमती तेजस्विनी सावंत,राही सरनोबत, स्वरुप उन्हाळकर तसेच आंतरराष्ट्रीय खेळाडू ज्यांना शासनाकडून अनुदान प्राप्त झाले असे उज्वला चव्हाण,अभिषेक जाधव, अफ़्रिद अत्तार, विवेक मोरे, स्वप्निल पाटील, आरती पाटील, वैष्णवी सुतार, प्रथमेश कापडे, दत्तप्रासद चौगले, खुशबु रिकिबादर, मान्तेश पाटील, पृथ्वीराज पाटील,सुरज आसवले, कोमल देसाई इत्यादी खेळाडूंचा सत्कार करण्यात आला.
     जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी  मनोगत व्यक्त करताना कोल्हापूरला क्रीडा परंपरेची असणारी परंपरा ही किती जुन्या काळापासून आहे याची माहिती दिली. १९२० सालच्या ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेतही कोल्हापूरचा रंगनाथ पाटील यांनी सहभाग घेतल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी कोल्हापूरच्या लोकांमध्ये कुस्तीविषयी असणाऱ्या प्रेमाची आठवण सांगत असताना, ते  विद्यार्थीदशेत असताना पैलवान युवराज पाटील आणि पैलवान सतपाल यांच्यातील लढत कोण जिंकणार याची घराघरांमध्ये चर्चा रंगत असे अशी आठवणही सांगितली.
     जिल्हा क्रीडाधिकारी डॉ. चंद्रशेखर साखरे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी त्यांनी शालेय क्रीडा स्पर्धेतील कोल्हापूर जिल्ह्यातील खेळाडूंच्या कामगिरीचा आढावा सांगितला. शासनाच्यावतीने खेळाडूंना देण्यात येणाऱ्या सोयीसुविधा, आधुनिक तंत्रज्ञान, प्रशिक्षण शिबिराचे आयोजन यातून भविष्यातदेखील अनेक आंतरराष्ट्रीय खेळाडू कोल्हापूरात घडतील. येथील खेळाडू स्व. खाशाबा जाधव यांच्याकडून प्रेरणा घेऊन कोल्हापूरचे नाव जागतिक स्तरावर पोहोचतील, असा मानस व्यक्त केला.
     यावेळी अर्जुन अॅवार्ड आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस खेळाडू शैलजा साळोखे, खाशाबा जाधव यांचे पुतणे शामराव जाधव, नेमबाज तेजस्विनी सावंत, आमदार चंद्रकांत जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. योग प्रशिक्षक रवी भूषण कुमठेकर यांची विद्यार्थीनी गार्गी भट हिने योग प्रात्यक्षिके केली.
      यावेळी माजी महापौर निलोफर आजरेकर, श्रीमती शोभाताई बोंद्रे , हिंदकेसरी दीनानाथ सिंह व जीवनगौरव पुरस्कार विजेते बिभीषण पाटील, आंतरराष्ट्रीय नेमबाज सचिन चव्हाण यांच्यासह जिल्हा क्रीडा कार्यालयातील कर्मचारी व शिक्षक  उपस्थित होते. श्री. माने यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!