कोल्हापूर उत्तरच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपाकडून सहा इच्छूकांच्या मुलाखती

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
      कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी सोमवारी (दि.१४) भारतीय जनता पार्टीने इच्छूक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष महेश जाधव, माजी नगरसेवक सत्यजित उर्फ नाना कदम, माजी नगरसेवक अजित ठाणेकर, पदवीधर संघटन मित्र माणिक पाटील – चुयेकर, दौलत देसाई व सचिन तोडकर यांनी उमेदवारीची मागणी केली आहे. भाजपाच्यावतीने हॉटेल अयोध्या येथे मुलाखती पार पडल्या.
       कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणूकीचा कार्यक्रम शनिवारी (दि.१२) केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. १२ एप्रिल रोजी मतदान होणार असून १६ एप्रिल रोजी मतमोजणी होणार आहे. कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे तत्कालीन आमदार चंद्रकांत जाधव यांच्या अकाली निधनामुळे या मतदारसंघाची जागा रिक्त झाली होती.
       शनिवारी केंद्रीय निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्यानंतर या मतदारसंघातील हालचाली गतिमान होऊ लागल्या आहेत. निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. सोमवारी भाजपाने इच्छूक असणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष महेश जाधव, माजी नगरसेवक सत्यजित उर्फ नाना कदम, माजी नगरसेवक अजित ठाणेकर, पदवीधर संघटन मित्र माणिक पाटील – चुयेकर, दौलत देसाई व सचिन तोडकर यांनी भाजपाकडे उमेदवारीची मागणी केली आहे. या सहा इच्छूक उमेदवारांच्या मुलाखती प्रदेश संघटनमंत्री मकरंद देशपांडे, माजी खासदार व भाजपाचे प्रदेश प्रवक्ते धनंजय महाडिक, माजी आमदार सुरेश हाळवणकर, महानगर जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, माजी आमदार अमल महाडिक यांनी मुलाखत घेतल्या. सर्वप्रथम इच्छूक उमेदवारांच्या स्वतंत्र मुलाखती झाल्या. त्यानंतर सर्वजण एकत्र येऊन चर्चा झाली. भारतीय जनता पार्टीने इच्छूक उमेदवारांच्या मुलाखतीचा पहिला टप्पा पूर्ण केला आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!