दगडफेकीची चौकशी करून आरोपींवर कारवाई करा: महिला शिष्टमंडळाची मागणी

Spread the love

• कोल्हापूरची बदनामी करू नये: ना.सतेज पाटील
कोल्हापूर • प्रतिनिधी
      भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा सौ. चित्रा वाघ यांच्या मुक्तसैनिक वसाहत येथील सभेवेळी झालेल्या कथित दगडफेकीची सखोल चौकशी करुन खऱ्या आरोपींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी महाविकास आघाडीच्या महिला शिष्टमंडळाने जिल्हा पोलिस प्रमुख डॉ.शैलेश बलकवडे यांच्याकडे केली आहे.
      दरम्यान, सभेच्यावेळी दगडफेक झाली असे म्हणून कोणी कोल्हापूरला बदनाम करू नये. कोल्हापूरकर अशी बदनामी सहन करणार नाहीत. कोल्हापूर सुरक्षित आहे ते बदनाम करण्याचं षडयंत्र कोणी करू नये. यापुढे भाजप नेत्यांना डबल सुरक्षा द्यावी, असे मत पालकमंत्री सतेज पाटील यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
       कॉंग्रेसच्या महिला शहर अध्यक्षा सौ.संध्या घोटणे, राष्ट्रवादी काँग्रेस महिला अध्यक्षा जहिदा मुजावर, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सदस्या सरला पाटील, शिवसेना महिला शहरप्रमुख सौ.मंगला साळोखे, माजी शहर महिला अध्यक्षा सौ.पूजा भोर, माजी नगरसेविका भारती पोवार, सौ. सुलोचना नाईकवाडे आदी महिलांच्या शिष्टमंडळाने जिल्हा पोलिस प्रमुख यांना निवेदन दिले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपच्या पायाखालची वाळू घसरली आहे. व्यथित झालेल्या भाजपने महिलांची सहानुभूती आपल्याला मिळावी यासाठी दगडफेकीचा हा प्रकार घडवून आणला आहे. कोल्हापूर हे महिलांचा सन्मान करणारे पुरोगामी विचाराचे शहर आहे. त्यामुळे कोणत्याही महिलेचा आम्ही अवमान खपवून घेणार नाही. पण केवळ सहानुभूतीसाठी दगडफेकी सारखे षडयंत्र घडवून आणले जात असेल तर त्याचीसुध्दा पोलीस यंत्रणेमार्फत सखोल चौकशी होवून खऱ्या आरोपीचा चेहरा कोल्हापूरकरांसमोर लवकरात लवकर आणावा.   
       तसेच कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीमध्ये भाजप प्रदेश उपाध्यक्षा सौ. चित्रा वाघ यांच्या जाहीर सभेवेळी दगडफेक झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. पण हा सर्व प्रकार पूर्वनियोजित असून विरोधकांनीच हा प्रकार घडविल्याचा ठोस दावा केला आहे. याबाबत त्यांनी काही मुद्दे निवेदनात मांडले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!