आयएसएल फुटबॉल स्पर्धा २०पासून गोव्यात


कोल्हापूरचा अनिकेत जाधव खेळणार जमशेदपूर एफसीकडून

कोल्हापूर • प्रतिनिधी
    इंडियन सुपर लीग ( आयएसएल ) फुटबॉल स्पर्धेला २० नोव्हेंबरपासून गोव्यात प्रारंभ होत आहे. सध्याच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रेक्षकांना प्रत्यक्ष मैदानावर उपस्थित राहून  स्पर्धेतील सामने पाहता येणार नाहीत. स्पर्धेत ११ संघ सहभागी असून एकूण ११५ सामने होतील. त्यापैकी ५५सामन्यांचे वेळापत्रक नुकतेच प्रसिद्ध झाले आहे.
      दरम्यान, या स्पर्धेत जमशेदपूर एफसी संघांचा सहभाग असून या संघाकडून कोल्हापूरचा अनिकेत जाधव खेळणार आहे. सलग दुसऱ्या वर्षी अनिकेत या संघाचे प्रतिनिधित्व करत आहे. अनिकेत जाधवने २०१७ साली भारतात झालेल्या फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले होते.
       आयएसएल फुटबॉल स्पर्धेतील सामने बंदिस्त स्टेडियमवर प्रेक्षकांविना होतील. मडगावमधील जवाहरलाल नेहरू स्टेडियम (फातोर्डा), बांबोळीतील जीएमसी अथलेटिक स्टेडियम आणि वास्कोतील टिळक मैदान या स्टेडियमवर सामने होतील. दि. २० नोव्हेंबर रोजी आयएसएलच्या सातव्या मोसमास प्रारंभ होईल. बांबोळीतील जीएमसी स्टेडियमवर सायंकाळी ७:३० वाजता केरळ ब्लास्टर्स आणि एटीके मोहन बगान या संघादरम्यान सलामीची लढत होईल. स्पर्धेत ११ संघ असून ते डबल राऊंड रॉबिनमध्ये खेळतील.यातील प्रथम चार स्थाने मिळविणारे संघ स्पर्धेच्या प्ले ऑफमध्ये जातील.
         स्पर्धेतील सहभागी संघ
     सन २०२०-२१ च्या आयएसएल स्पर्धेत केरळ ब्लास्टर्स,एटीके मोहन बगान,बेंगलोर एफसी, एफसी गोवा,चेन्नईन एफसी, मुंबई सिटी एफसी, ओडिशा एफसी, एससी ईस्ट बंगाल, हैदराबाद एफसी, जमशेदपूर एफसी, नॉर्थईस्ट युनायटेड एफसी असे संघ सहभागी आहेत.  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *