‘जय भवानी जय शिवाजी’च्या गजरात किल्ले रायगडावर शिवराज्यभिषेक सोहळा


कोल्हापूर • प्रतिनिधी
     हिंदवी स्वराज्य संस्थापक, युगपुरुष  छत्रपती शिवाजी महाराज यांचा ३४८ वा शिवराज्याभिषेक सोहळा रविवारी स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडावर साधेपणाने आणि मोजक्याच शिवप्रेमींच्या उपस्थितीत, अखिल भारतीय शिवराज्याभिषेक सोहळा महोत्सव समितीच्यावतीने साजरा करण्यात आला.
     रविवारी सकाळी युवराज छत्रपती संभाजीराजे आणि यौवराज छत्रपती शहाजीराजे यांच्या हस्ते रायगडावरील नगारखान्यासमोरील ध्वजस्तंभावर भव्य भगवा ध्वज फडकवून सोहळ्याच्या मुख्य दिवसाची सुरुवात झाली. यानंतर युवराज संभाजीराजे व यौवराज शहाजीराजे यांचे छत्रपती शिवाजी महाराजांच्या उत्सवमुर्तीसह राजसदरेवर आगमन झाले. त्यांच्या हस्ते उत्सवमुर्तीवर वैदिक मंत्रोच्चारात अभिषेक घालण्यात आला. यावेळी रायगडावरील विठ्ठल औकीरकरांनी संभाजीराजे छत्रपतींकडे सुपुर्त केलेल्या सोन्याच्या होनची विधीवत पुजा करण्यात आली. त्यानंतर मेघडंबरीतील ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुर्तीला पुष्पहार अर्पण करून, मानाचा मुजरा करून, सुवर्ण नाण्यांचा अभिषेक घालण्यात आला. यावेळी उपस्थित शिवप्रेमींनी “छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी, तुमचं आमचं नातं काय जय जिजाऊ जय शिवराय” अशा घोषणांनी वातावरण शिवमय केले.
    यानंतर राजसदरेवरून श्रीमंत संभाजीराजे छत्रपतींनी समस्त शिवभक्तांना मार्गदर्शन केले.
यानंतर शिवाजी महाराजांच्या उत्सव मूर्तीसह युवराज संभाजीराजे यांनी जगदीश्वर मंदिराकडे प्रस्थान करुन, शंभुमहादेवाचे दर्शन घेतले. तसेच येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीस्थळास अभिवादन करुन, या सोहळ्याची सांगता  केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक समितीचे अध्यक्ष फत्तेसिंह सांवत यांनी तर सूत्रसंचालन सदस्य सुखदेव गिरी यांनी केले.
      कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव असतानाही लोकोत्सव बनलेल्या या पारंपरिक सोहळ्यात खंड पडला नाही.
अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्यावतीने युवराज संभाजीराजे छत्रपती व युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी किल्ले रायगडावर दि.५ व ६ जून रोजी हा सोहळा साजरा करण्यात येतो. गतवर्षाप्रमाणे यंदाही कोरोनाच्या संकटामुळे मोजक्याच शिवप्रेमींच्या उपस्थितीत हा सोहळा साजरा करण्याचा निर्णय घेतल्याने समितीचे मोजकेच पदाधिकारी व कार्यकर्ते किल्ले रायगडवर होते.
      तत्पूर्वी, शनिवारी परंपरेनुसार सायंकाळी गडावरील गडकऱ्यांच्या उपस्थितीत विधीवत गडपुजनाने शिवराज्याभिषेक सोहळ्यास सुरुवात झाली. राजसदरेवरील मेघडंबरीतील ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुर्ती सभोवती आकर्षक सजावट करण्यात आली. रात्री गडदेवता शिरकाई देवीसमोर गोंधळ घालण्यात आला. होळीच्या माळावर शिवकालीन तलवारबाजी, दांडपट्टा अशा थरारक मर्दानी खेळांच्या प्रात्यक्षिकांतून शिवरायांना मानवंदना देण्यात आली.
     यावेळी समितीचे कार्याध्यक्ष हेमंत साळोखे, राहुल शिंदे, विनायक फाळके, संजय पोवार, संदिप खांडेकर, प्रविण हूबाळे, सत्यजित आवटे, अमर पाटील, प्रविण पोवार, सोमनाथ लांबोरे, प्रसन्न मोहिते, अजय पाटील, धनंजय जाधव, अतुल चव्हाण, सागर पाटील, भरत कांबळे, विश्वास काशिद आदींसह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
———————————————– Attachments areaReplyForward

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *