कोल्हापूर • प्रतिनिधी
बेलापूर (जि.अहमदनगर) येथील स्वातंत्र्यसैनिक झुंबरलाल हिरण यांचे सुपूत्र व्यापारी गौतम हिरण यांचे अपहरण होऊन निर्घृण हत्या झाल्याच्या निषेधार्थ अखिल भारतीय जैन अल्पसंख्यक महासंघाच्यावतीने व विविध व्यापारी संघटनांच्यावतीने राज्यभर निदर्शने करण्यात आल्याची माहिती महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष ललित गांधी व महामंत्री संदीप भंडारी यांनी दिली.
महाराष्ट्रात मुंबई, पुणे, कोल्हापूर, नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद, बीड, नांदेड, नागपुर, सांगली, सातारा, अमरावती, अकोला या प्रमुख ठिकाणांसह राज्यात विविध ११० ठिकाणी निदर्शने करण्यात आली व स्थानिकस्तरावर प्रशासकीय अधिकारी, पोलीस अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
राष्ट्रीय अध्यक्ष ललित गांधी व राष्ट्रीय महामंत्री संदीप भंडारी हे कोल्हापूर येथील आंदोलनात सहभागी झाले व शिष्टमंडळासह जिल्हा पोलीसप्रमुख शैलेश बलकवडे यांची भेट घेऊन निवेदन दिले. गौतम हिरण यांच्या खुन्यांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई व्हावी, या संपुर्ण प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी एसआयटी गठीत करावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
ललित गांधी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळात महामंत्री संदीप भंडारी, रणजित पारेख, प्रशांत पोकळे, प्रताप पोवार, इंदर चौधरी, विपूल पारेख, दर्शन गांधी, भरत रावल, दिपक पुरोहित यांनी सहभाग घेतला.
———————————————–