राधानगरी अभयारण्यातील पर्यटनासाठी ‘जंगल सफारी बस’ उपक्रम

Spread the love

• ‘जंगल सफारी बस’चे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
कोल्हापूर • (जिमाका)
     वन्यजीव विभागाच्यावतीने सुरु होत असलेल्या ‘जंगल सफारी बस’ उपक्रमामुळे राधानगरी अभयारण्यातील पर्यटनाला चालना मिळेल, असे प्रतिपादन पालकमंत्री सतेज पाटील यांनी केले.
     राधानगरी, दाजीपूर जंगल सफारीच्या उद्देशाने वन्यप्राण्यांच्या चित्रांनी सजविलेल्या बसचे उदघाटन आज पालकमंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून ‘वन विश्राम गृह’ येथे करण्यात आले. यावेळी खासदार संजय मंडलिक, मुख्य वनसंरक्षक क्लेमेंट बेन, सह्याद्री व्याघ्र राखीव विभागाचे वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक समाधान चव्हाण, विभागीय वन अधिकारी विशाल माळी, तसेच वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. आजच्या बसमधून बालकल्याण संकुल येथील १५ अनाथ मुलांना मोफत जंगल सफारीचा लाभ देण्यात येत आहे.
     पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, कोल्हापूरमधून निघणाऱ्या ‘जंगल सफारी बस’ मुळे देश विदेशातून राधानगरी परिसराच्या पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांची सोय होईल. तसेच त्यांना अभयारण्यातील जैवविविधता व पशुपक्षी पाहण्याची संधी मिळेल. जंगलामध्ये पर्यटनाच्या हेतूने नवीन ट्रेकरुट व सायकल रुट सुरु करावेत, अशा सूचना त्यांनी यावेळी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना केल्या.
     राधानगरी अभयारण्य हे जागतिक वारसा स्थळ म्हणून प्रसिद्ध असून येथील पर्यटनाला चालना मिळावी या उद्देशाने पालकमंत्री सतेज पाटील यांच्या पुढाकाराने जिल्हा वार्षिक योजना आराखड्यात तरतूद करून कोल्हापूर वन्यजीव विभागास १५+२  सीटर बस घेण्यात आली आहे. ही बस आठवड्यातून सहा दिवस बुधवार ते सोमवारी (मंगळवारी सुट्टी) दररोज सकाळी  सात वाजता वन विश्रामगृह, ताराबाई पार्क, नाना नानी पार्कसमोर, कोल्हापूर येथून राधानगरी, दाजीपूर पर्यटनासाठी निघेल. एका पर्यटकाला नाममात्र ३०० रुपये फीमध्ये एकवेळ चहा, नाश्त्यासह दिवसभर जंगल सफारीचा आनंद लुटता येणार आहे.
     राधानगरी अभयारण्यात हत्तीमहाल, फुलपाखरु उद्यान, राऊतवाडी धबधबा, माळेवाडी डॅम बोटिंग व दाजीपूर निसर्ग माहिती केंद्र व गवा सफारी या सर्व ठिकाणांना भेट देता येणार आहे. आठवड्यातून एक दिवस या बसमधून शासनातर्फे अनाथ, दिव्यांग व्यक्ती, विद्यार्थी यांनादेखील मोफत जंगल सफारी करता येणार आहे.
      या बसच्या बुकिंगसाठी विभागीय वन अधिकारी (वन्यजीव) यांचे कार्यालय, सिमंतिनी अपार्टमेंट, रमणमळा, कोल्हापूर दूरध्वनी क्रमांक ०२३१- २६६९७३० येथे कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन विशाल माळी यांनी केले.
——————————————————- Attachments area

ReplyForward

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!