कोल्हापूर • प्रतिनिधी
नरक चतुर्दशीच्या दिवशी म्हणजेच दिवाळीच्या पहिल्या दिवशी साडेतीन शक्तिपीठांपैकी एक पूर्णपीठ असलेल्या श्री करवीरनिवासिनी अंबाबाई – महालक्ष्मी देवीच्या मंदिरात काकड्यास प्रारंभ झाला. मंदिराच्या मुख्य शिखरावर पश्चिमेकडील बाजूला पहाटे दोन वाजता कापूर प्रज्वलित केला जातो, यास काकडा म्हणतात. मंदिराच्या मुख्य शिखरावर पंधरा दिवस कापूर लावून काकडा प्रज्वलित केला जातो.
सध्या कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर मंदिर दर्शनासाठी बंद आहे. काकडा पेटवण्याचे पहायचे असल्यास मंदिराच्या बाहेरील परिसरातून दिसते.
अश्विन कृष्ण चतुर्दशी ते कार्तिक पौर्णिमा यादरम्यान अंबाबाई मंदिरातील नित्योपचारात बदल होतो. मंदिरातील मुख्य शिखरावर पंधरा दिवस काकडा कापूर लावून प्रज्वलित केला जातो. अंबाबाई मंदिरात भांड्यामध्ये कणकेचा सुताची जाड वात असलेला काकडा मंदिरातील गणपतीसमोर ठेवला जातो. तेथे भाविक कापूर आणि तुपाच्या वाती त्यावर घालतात. त्यानंतर तो काकडा शिखरावर नेऊन नरक चतुर्दशी अर्थात दिवाळी दिवशी पहाटे दोन वाजता मशालीने काकडा प्रज्वलित करतात. यावेळी घाटी दरवाजावरील घंटेचा नाद चालू असतो.
काकडा घेऊन शिखराकडे पाठ करून वर चढत जाऊन परत तसेच उतरणे हि सेवा अंबाबाईचे निस्सीम भक्तच करू शकतात. मंदिराच्या मुख्य शिखरासह पाचही शिखरांना कापूर प्रज्वलीत करून मंदिर परिसरातील सर्व देवी – देवतांसमोर कापूर प्रज्वलित केला जातो. त्यानंतर पितळी उंबर्यावर कापूर लावून मंदिराचा दरवाजा उघडून त्यानंतर गाभार्याचा दरवाजा उघडला जातो. यानंतर नित्योपचार होऊन देवीची काकड आरती होते.
या पंधरा दिवसात श्री अंबाबाईची एक तरी काकड आरती तसेच काकडा पेटवण्याचे दर्शन घ्यावे,अशी भाविकांची श्रद्धा आहे. नरक चतुर्दशी दिवशी पहाटे काकडा प्रज्वलित केला जातो. त्यानंतर गाभार्याचा दरवाजा उघडला जातो व नित्योपचार होऊन देवीची काकड आरती होते. कायम आरतीच्यावेळी पुरुषमंडळी पितळी उंबऱ्याच्या बाहेर असतात पण या पंधरा दिवसात हे उलटे असते. पूर्वीच्याकाळी स्थानिक महिला पाच आरतीचा नियम करत असत, त्यामुळे महिला भाविकांची संख्या अधिक असल्याने त्यावेळी ही सोय केली असावी. इतर कोणताही भेद नसावा. इतरवेळी होणारी रात्री १०:१० मिनिटांनी होणारी शेजारती ९:४० मिनिटांनी होते आणि इतरवेळी १०:३० वाजता बंद होणारा गाभार्याचा दरवाजा रात्री १० वाजता बंद होतो. या पंधरा दिवसात सकाळी ९:३० ला होणारी आरती ६:३०वा होते. तसेच या पंधरा दिवसात रात्री होणारा पालखी परिक्रमा सोहळा ८:४५ वाजता होतो. त्यानंतर दर शुक्रवारी होणारी पालखी परिक्रमा माघ सप्तमी अर्थात रथसप्तमीपर्यंत रात्री ९:१५ वाजता होते. कार्तिक पौर्णिमा अर्थात त्रिपुरारी पौर्णिमा यादिवशी मंदिरात दीपोत्सव साजरा केला जातो. त्यानंतर काकडा सोहळा समाप्त होतो.
…………………………………………..