कोल्हापूर • प्रतिनिधी
अश्र्विन शुद्ध षष्ठीला म्हणजेच नवरात्रातील सहाव्या माळेला करवीरनिवासिनी श्री अंबाबाई – महालक्ष्मी देवीची ‘ काशीविश्वेश्वरांना दर्शन ‘ स्वरूपात सालंकृत पूजा बांधण्यात आली. ही पूजा मकरंद मुनिश्वर आणि माधव मुनिश्वर यांनी बांधली.
यंदाच्या नवरात्रौत्सवात करवीरनिवासिनी श्री अंबाबाईचे करवीर महात्म्यातील निवडक स्तोत्रांमधून होणारे दर्शन ही पूजेसाठी संकल्पना राबवली आहे. साडेतीन शक्तिपीठांपैकी एक पीठ असलेल्या करवीरनिवासिनी श्री अंबाबाई – महालक्ष्मी देवीची नवरात्रातील षष्ठीला बांधलेल्या पूजेचा संदर्भ असा, षष्ठी तिथीला करवीरनिवासिनी शिवाची आराध्या बनून विराजमान आहे.या प्रसंगाची पार्श्र्वभूमी अशी, करवीर क्षेत्रात असलेले ‘ दशाश्वमेध तीर्थ ‘ व त्याचे महत्त्व श्रीशिव पार्वतीला सांगतात व उमेसह करवीरक्षेत्री राहण्यासाठी क्षेत्रदेवतेची, म्हणजेच श्री महालक्ष्मीची स्तुती करून परवानगी मागतात. तेव्हा महालक्ष्मी श्रीशिवाला तिच्या उजव्या हाताच्या दिशेला वास करण्यास व येथील प्रत्येक जीवास अंती तारकमंत्राचा उपदेश करण्यास सांगते.तोच ईशान सध्या महालक्ष्मी मंदिराच्या उजव्या बाजूचा ‘ काशीविश्वेश्वर ‘. त्याच्यासमोर काशीकुंडही आहे. यास्तव करवीराला काशीचा दर्जा आहे.स्वत: करवीरनिवासिनी करवीरमहात्म्यात सांगते की, जे काशीविश्वेश्वराचे व महालक्ष्मीचे नित्य दर्शन घेतात त्यांचे दर्शन सफल होते.