लॉकडाऊनमधील “कथाविष्कार..!”

Spread the love


कोल्हापूर :
       अदृश्य विषाणूच्या वावराने दृष्य स्वरूपातील मानवी हालचालींवर अनेक बंधने आली. पृथ्वीवरील विशाल देशसुध्दा ‘लॉक’ झाले. विविध दैनंदिन व्यवहार ‘डाऊन’ झाले. याकाळात घरकोंबडा बनलेल्या माणसाने मग ‘तू नळी’ला हात घातला. अर्थात यू-ट्यूबच्या माध्यमातून नव्या प्रयोगांचा अविष्कार घराघरात करू लागला. नव-नव्या समाज माध्यमांच्या जंजाळात लिखित वाचन चळवळ हरवली. हा आरोप खोडून काढण्यासाठी याच समाज माध्यमाचा वापर करत, ‘सर्वस्पर्शी प्रतिभांचा कथाविष्कार’ हा प्रातिनिधिक कथासंग्रह छापून तयार झाला. अर्थात हे घडलं ते ग्रामीण कथाकार बबन पोतदार यांच्यामुळे..!
     लॉकडाऊनच्या काळात व्हॉटस्ॲप गटाच्या माध्यमातून वाचन आणि वाचक चळवळ सर्वदूर करण्यासाठी श्री. पोतदार यांनी पुढाकार घेतला. या गटामध्ये दिग्गज साहित्यिकांसोबतच माझ्यासारख्या नव लेखकालाही प्राधान्य मिळाले. या गटावर दररोज एका लेखकाची कसदार कथा श्री. पोतदार पाठवत असत. ती पाठवताना कथेसोबत लेखकाचा परिचय आणि कथेमागील बीज याचाही आवर्जून समावेश असायचा. या कथेवर पुढे आठवडाभर चर्चा व्हायची. एका लेखकाच्या लेखनावर कसलेल्या साहित्यिक सदस्यांकडूनच परीक्षण होत होते.
     या गटामध्ये देशातील विशेषत: महाराष्ट्रातील आणि बेळगाव सीमा भागातील विविध भागात नोकरी, उद्योग करणाऱ्या लेखकांचा समावेश आहे. त्यामुळे प्रत्येक लेखनात त्या भागातील प्रादेशिकता, वेगळ्या चालीरिती, तेथील परंपरा, भाषेचा लहेजा उतरलेला असायचा. हा साहित्यिक गोडवा वाचायला, प्रसंगी अनुभवायला मिळाल्याने वाचकाची  अनुभव संपन्नता अधिक रूंदावत गेली. पुढे याच २०० हून अधिक असणाऱ्या गट सदस्यांमधून निवडक कथांचा संग्रह प्रकाशित करण्याची संकल्पना पुढे आली आणि तिने मूर्त स्वरूपही धारण केले.
     ‘सर्वस्पर्शी प्रतिभांचा कथाविष्कार’ या प्रातिनिधिक कथासंग्रहाची छपाई पुणे येथील वेदान्तश्री प्रकाशनाने केली असून याची २५० रूपये किंमत आहे. पिंपरी येथे झालेल्या ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्यसंमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी १६ पानांची प्रस्तावना लिहिली आहे. ही प्रस्तावना म्हणजे या लेखनाची समीक्षाच ठरते. त्यामधूनही वाचकांना आणि लेखकांना उभारी देण्याचा उद्देश दिसून येतो.
      या कथासंग्रहात बबन पोतदार, लक्ष्मीकमल गेडाम, संध्या धर्माधिकारी, राजेंद्र भोसले, मंगला बक्षी, वंदना धर्माधिकारी, अजित काटकर, सुवर्णा मस्कर, प्रशांत सातपुते, पौलस वाघमारे, राजेंद्र अत्रे, सुनील वेदपाठक, डॉ. राजश्री पाटील, हरिश्‍चंद्र पाटील, शंकर पाटील, दीपक लोंढाळ, प्रकाश महामुनी, गुणवंत पाटील, बबन कदम आणि आशा पाटील या २० साहित्यिकांच्या कथांचा समावेश आहे.
या साहित्यिकांमधील कोणी न्यायाधीश आहे. कोणी शासकीय अधिकारी आहे. कोणी वकील, कोणी पत्रकार, कोणी डॉक्टर तर कोणी साहित्यिक, कोणी शेतकरीदेखील आहे. लवकरच या कथासंग्रहाचा प्रकाशन सोहळा अपेक्षित असून तो यथायोग्य ऑनलाईन पार पडेल. तोपर्यंत वाचकांनी या कथासंग्रहाची मागणी नोंदवून आपले वाचन चळवळीला पाठबळ द्यावे. शिवाय मनोरंजनातून अनुभव विश्व व्यापक करावे. या निमित्ताने एवढचं.
     संपर्क: संपादन बबन पोतदार, ५८३ घोरपडे पेठ, लक्ष्मीनारायण बिल्डिंग स्वारगेट, पुणे ४११०४२, भ्रमणध्वनी  ९८६०६०९०२१
    वेदान्तश्री प्रकाशन, १६७५/१, कृष्णलिला चेंबर्स, सदाशिव पेठ, टिळक रोड, एसपी कॉलेजसमोर, पुणे ४११०३०, दूरध्वनी ०२०-२४४७८०८० , भ्रमणध्वनी- ९७६४१५७०३५
              ……………..
                          प्रशांत सातपुते
   जिल्हा माहिती अधिकारी, कोल्हापूर

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!