रिटेल डेमोक्रॉसी डे’निमित्त ई-कॉमर्स कंपन्यांवर कारवाईची मागणी

कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजतर्फे पंतप्रधानांना साकडे
कोल्हापूर • प्रतिनिधी
     १५ डिसेंबर २०२० हा दिवस ‘कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स, नवी दिल्ली’ (कॅट) या देशातील व्यापारी संघटनेने ‘रिटेल डेमोक्रॉसी डे’ साजरा करण्याचे ठरविलेले आहे. त्यानिमित्त देशाच्या ४० कोटी लोकांचा उदरनिर्वाह चालत असलेल्या किरकोळ व्यवसायावर एकाधिकारशाही निर्माण करणाऱ्या ई-कॉमर्स कंपन्यांविरूद्ध कडक कारवाई करून भारतातील ई-कॉमर्स व्यवसायाचे नियमन व देखरेख करण्यासाठी सशक्त नियामक प्राधिकरणाची स्पष्ट तरतूद असलेले ई-कॉमर्स धोरण त्वरित जाहीर करावे, अशी मागणी कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना देण्यात आले.
      भारताच्या व्यापारी समुदायातर्फे “लोकल ऑन व्होकल” आणि “आत्मनिर्भर भारत” यासारख्या गतिशील मोहिमेला देशभरातील व्यापारी सर्वोत्तम सहकार्य करणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना द्यावयाचे निवेदन, त्यांचे शासकीय प्रतिनिधी स्थानिक जिल्हापातळीवरील जिल्हाधिकारी यांना सर्व देशभरातील व्यापारी संघटनाकडून द्यावे. असे ‘कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स, नवी दिल्ली’ (कॅट) या संघटनेकडून घोषणा करण्यात आली. त्यानुसार कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजतर्फे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना निवेदन देण्यात आले.
     ई-कॉमर्स कंपन्यांनी आपल्या अमर्यादित स्त्रोतांच्या जोरावर सरकारच्या एफडीआय धोरणाचे, संबंधित व्यापारी कायद्यांचे आणि नियमांचे उल्लंघन केले आहे. त्यांच्याविरूद्ध अनेक तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही हे फार खेदजनक आहे. अशा परिस्थितीत, सरकारने सुरू केलेली “व्होकल फॉर लोकल” आणि “आत्मनिर्भर भारत” या चांगल्या मोहिमेचा प्रतिकूल परिणाम भारतीय व्यापाऱ्यांच्या व्यापारी स्थितीवरही होत आहे. तसेच, दि.२५ मार्चपासून कोवीड-१९ या साथीच्या रोगाचा प्रार्दुभाव सुरू झाला व त्या दिवसापासून शासनाने लॉकडाऊन जाहीर केला. या लॉकडाऊनमध्ये सर्व व्यापाऱ्यांचे दैनंदिन व्यवहार बंद होते व अजूनही व्यापार पूर्वपदावर येण्यास वेळ लागत आहे. त्यामुळे सध्या व्यापऱ्यांची आर्थिक व व्यावसायीक परिस्थिती बिकट झाली आहे.
     निवेदन देण्यासाठी कॅट संघटनेचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष व कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष संजय शेटे, कॅटचे उपाध्यक्ष धैर्यशील पाटील व संघटन सचिव  ललित गांधी, कोल्हापूर चेंबरचे उपाध्यक्ष शिवाजीराव पोवार, मानद सचिव धनंजय दुग्गे यांच्यासह जयेश ओसवाल, प्रदिपभाई कापडिया, संचालक राहूल नष्टे, प्रशांत शिंदे व संभाजीराव पोवार, विजय नारायणपूरे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *