• थकीत कर्जापोटी ७० कोटी रुपये केला भरणा
कोल्हापूर • प्रतिनिधी
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँके (केडीसीसी)ने आजरा सहकारी साखर कारखान्याचा ताबा कारखान्याच्या संचालक मंडळाकडे सुपूर्द केला आहे. कारखान्यांने थकित कर्जापोटीची ७० कोटी रुपये रक्कम भरली. यामुळे कारखान्याला नवीन कर्ज मिळण्यासह हा हंगाम सुरू होण्याच्या आशाही पल्लवित झाल्या आहेत.
सकाळी साडेअकराच्या सुमाराला केडीसीसी बँकेचे अधिकारी गवसे ता. आजरा येथील कारखाना कार्यस्थळावर दाखल झाले. त्यानंतर दुपारी तीन वाजेपर्यंत कागदपत्रांची पूर्तता होऊन दुपारी साडेतीन वाजता कुलूप उघडून कारखान्याचा ताबा संचालक मंडळाकडे देण्यात आला.
केडीसीसी बँकेकडून कारखान्याचा ताबा मिळाल्यानंतर कारखाना परिसरात असलेल्या संस्थापक आमदार कै. वसंतराव देसाई यांच्या पुतळ्याला कारखान्याच्या संचालक व अधिकाऱ्यांनी पुष्पहार घातला.
याबाबत अधिक माहिती अशी, केडीसीसी बँकेने साखर कारखान्याकडून कर्ज परतफेड थकल्यामुळे आजरा साखर कारखान्याचा ताबा घेतला होता. सेक्युरिटायजेशन ॲक्ट – २००२ नुसार बँकेने ही कारवाई करून दि.२६ मे २०२० रोजी कारखान्याचा ताबा घेतला होता.
दरम्यान, थकीत कर्जापोटीची ७० कोटी रुपये रक्कम कारखान्याने भरल्यामुळे काल सोमवारी (दि.२८) झालेल्या बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत कारखान्याचा ताबा बँकेकडून कारखाना संचालक मंडळाकडे देण्याचा ठराव झाला होता. त्यानुसार बँकेचे प्राधिकृत अधिकारी विकास जगताप, पत नियंत्रण व्यवस्थापन विभाग- सीएमए सेलचे फिल्ड ऑफिसर जावेद फरास, वसुली विभागाचे अधिकारी प्रवीण चौगुले यांनी पंचनामा व कागदपत्रांची पूर्तता केली.
यावेळी कारखान्याचे अध्यक्ष प्रा. सुनील शिंत्रे, संचालक मुकुंद देसाई, मल्लिक बुरुड, अनिल फडके, जितेंद्र टोपले, दिगंबर देसाई, राजेंद्र सावंत आदी संचालकांसह प्रभारी कार्यकारी प्रकाश चव्हाण तसेच कारखान्याचे अधिकारी उपस्थित होते.
——————————————————-