केडीसीसी बँकेचा इन्कमटॅक्स विभागाकडून गौरव


 कोल्हापूर • प्रतिनिधी
     भारत सरकारच्या इन्कमटॅक्स विभागाने सर्वात जास्त आयकर भरणाऱ्या संस्थांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव केला. यामध्ये केडीसीसी बँकेचा गौरव केला आहे. बँकेने बिगर कंपनी विभागात कोल्हापूर परिक्षेत्रात प्रथम क्रमांक मिळविला आहे. कोल्हापूर परिक्षेत्रात कोल्हापूरसह सिंधुदुर्ग व रत्नागिरी या तीन जिल्ह्यांचा समावेश आहे.
     याबाबत अधिक माहिती अशी, “आजादी का अमृतमहोत्सव” या अभियानांतर्गत कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला २०२०-२१ सालातील सर्वसाधारण विभागातील द्वितीय पारितोषिक मिळाले आहे. अर्थात, बिगर कंपनी विभागातील हे  प्रथम पारितोषिक आहे. पुणे विभागाच्या  प्रधान मुख्य आयुक्त श्रीमती छवी अनुपम व कोल्हापूर विभागाचे सह आयुक्त डी. के. महाजन यांच्या हस्ते बँकेला हे गौरवपत्र प्रदान करण्यात आले. बँकेच्या संचालक मंडळाच्यावतीने हा पुरस्कार बँकेचे तज्ञ संचालक असिफ फरास व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ए. बी. माने यांनी एका विशेष कार्यक्रमात स्वीकारला.
     यावेळी पुण्यातून ऑनलाईन असलेल्या प्रधान मुख्य आयुक्त श्रीमती छवी अनुपम म्हणाल्या,  प्रामाणिकपणाने जास्तीत जास्त आयकर भरणाऱ्या संस्थांसाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. यावर्षी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला १४५ कोटी ढोबळ नफा होऊन, त्यातून १८ कोटी २२ लाखांचा इन्कमटॅक्स भरला आहे. सहआयुक्त डी. के. महाजन म्हणाले, कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने जास्तीत जास्त इन्कम टॅक्स भरून देश उभारणीला हातभार लावला आहे. बँकेने ही परंपरा यापुढेही कायम ठेवावी व राष्ट्रीय कार्यात योगदान द्यावे.
     बँकेच्यावतीने सत्काराला उत्तर देताना संचालक असिफ फरास म्हणाले, हा सत्कार दोन लाख, ९० हजार शेतकरी, अकरा हजार सहकारी संस्था सभासद, बँकेचे अध्यक्ष व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळाचा सत्कार आहे.
     बँकेचे अध्यक्ष व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली २०१५ साली बँकेचे संचालक मंडळ कार्यरत झाले. संचालक मंडळाने काटकसरीने कारभार सुरू केला. सुरवातीचा १०३ कोटी रुपयांचा संचित तोटा पहिल्या वर्षी भरून काढून दुसऱ्या वर्षापासून बँकेला निव्वळ नफा सुरू झाला. त्यानंतर बँकेने इन्कमटॅक्स भरण्यास सुरुवात केली. बँक अल्पावधीतच पूर्वपदावर येऊन अधिक सक्षम झाली. याबद्दल बँकेचे अध्यक्ष व मंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळासह शेतकरी, संस्था, सभासद, ग्राहक, हितचिंतक, अधिकारी व कर्मचाऱ्यांचे श्री. माने यांनी अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *