दिवाळी पाडव्यादिवशी केडीसीसीच्या सर्व शाखा राहणार सुरू : ए.बी.माने


कोल्हापूर • प्रतिनिधी
     कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सर्व म्हणजे १९३ शाखा सोमवारी (दि.१६) दिवाळी पाडव्याच्या सणादिवशीही सुरू राहणार आहेत. पाडव्याच्या मुहूर्तावर ठेवी स्वीकारण्यासाठी सकाळी साडेदहा ते दुपारी दीड वाजेपर्यंत  बँकेचे कामकाज सुरू राहणार असल्याची माहिती, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ए. बी. माने यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
    केडीसीसी बँकेने अलीकडेच सहा हजार कोटी ठेवींचा टप्पा यशस्वीरित्या पार केलेला आहे. तसेच बँकेचा संयुक्त व्यवसायही दहा हजार कोटींच्या पुढे गेलेला आहे. बँकेच्या ठेवीदारांनी दिवाळीच्या मुहूर्तावर आपल्या नजीकच्या शाखेमध्ये जाऊन ठेवी ठेवाव्यात, असे आवाहनही डॉ. श्री. माने यांनी केले आहे.*
     या पत्रकात पुढे म्हटले आहे, बँकेने कोविड  संसर्गाच्या महामारीत सुद्धा शेतकऱ्याला विनाविलंब पिक कर्ज पुरवठा व मध्यम मुदत कर्ज पुरवठा करून शेतीच्या कामामध्ये कोणताही अडथळा येणार नाही, याची खबरदारी घेतली आहे. त्यामुळेच सरकारने दिलेल्या पीक कर्जाच्या उद्दिष्टाच्या तब्बल २०८ टक्के पीक कर्ज वाटप करीत या बँकेने शेतकऱ्यांना फार मोठा दिलासा दिला आहे. तसेच शेतकऱ्यांच्या इतर अनुषंगिक गरजांसाठी मध्यम मुदतीचा कर्जपुरवठाही केला आहे. तसेच; बँकेने बचत गटांनाही प्रसंगी नियमात शिथिलता आणून अर्थपुरवठा केला आहे. कोविड संसर्गाच्या काळात ग्राहकाला घरातूनच व्यवहार करता यावेत यासाठी केडीसी बँकेने ‘केडीसीसी मोबाईल बँकिंग’ ही अद्ययावत सुविधा सुरू केली. जिल्ह्यातील सर्वच दूध वितरकांचा दूध बिल भरणा सुट्टी न घेता स्वीकारला जातो, हेही या बँकेचे वैशिष्ट्य आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *