चक्रवाढ व्याज व सरळ व्याजातील फरक कर्जदाराला मिळणार परत: केडीसीसी बँक

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
      कोरोना संसर्गाच्या महामारीच्या काळात भरलेले चक्रवाढव्याज व नियमित कर्जदारांनी भरलेले सरळव्याज या दोन्ही कर्ज खात्यावरील फरक परताव्यापोटी कर्जदारांना मिळणार आहे. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या मासिक बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय झाला. दरम्यान या बैठकीत शिक्षकांसह पगारदार खातेदारांनाही विमासुरक्षा कवच देण्याचा महत्त्वाचा निर्णय बँकेने घेतला आहे.
         याबाबत अधिक माहिती अशी, कोरोना संसर्गाच्या महामारीच्या काळात शैक्षणिक कर्ज, छोट्यामोठ्या व्यवसायांसाठी घेतलेली कर्जे, व्यक्तिगत कर्ज इत्यादी कर्जांचे मासिक हप्ते भरणे कर्जदारांसाठी अडचणीचे होऊन बसले होते. या काळात कर्जाचे नियमित हप्ते भरणारे कर्जदार आणि कर्जाचे हप्ते नियमित भरून न शकलेले कर्जदार अशा दोन्ही कर्जदारांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. ज्या कर्जदारांनी नियमित हप्ते भरलेले आहेत, त्यांच्यावर अन्याय होऊ नये यादृष्टीने त्यांच्या कर्ज खात्यावर चक्रवाढ व्याज किती झाले असते तेवढी रक्कम परताव्यापोटी कर्ज खात्यावर जमा होणार आहे. यामध्ये छोट्या-मोठ्या व्यवसायांसाठीची कर्ज, व्यक्तिगत कर्ज, शैक्षणिक कर्ज अश्या ज्या कर्जांवर बँकेने मासिक व्याज आकारणी केली आहे, अशा कर्ज खात्यांवर बँक पाच नोव्हेंबरपर्यंत परताव्याची ही रक्कम जमा करणार आहे. संपूर्ण जिल्हाभरातील याबाबतची माहिती संकलित करण्याचे काम सुरू आहे. लवकरच ते पूर्ण होईल.
    या बैठकीला माजी खासदार श्रीमती निवेदिता माने, आम. पी. एन. पाटील, आम. राजेश पाटील, आम. राजूबाबा आवळे, पी. जी. शिंदे, अनिल पाटील, आर. के. पवार, बाबासाहेब पाटील -आसुर्लेकर, प्रताप उर्फ भैय्या माने, असिफ फरास आदी संचालक उपस्थित होते.
    शिक्षकांसह पगारदार खातेदारांनाही विमासुरक्षा कवच……
      शिक्षक संघटनांसह विविध नोकरदार व पगारदार खातेदाराकडून विमा सुरक्षाकवच लागू करण्याची मागणी बँकेकडे होत होती. त्या अनुषंगाने शिक्षकांसह पगारदार खातेदारांनाही विमासुरक्षा कवच लागू करण्याचा महत्त्वाचा निर्णय केडीसीसी बॅंकेच्या संचालक मंडळाच्या या बैठकीत घेण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!