केडीसीसीच्या ७८ शिपायांची क्लार्कपदी नियुक्ती


कोल्हापूर • प्रतिनिधी
     कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (केडीसीसी) शिपाई पदावरील कर्मचाऱ्यांना व कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना अशा ७८ जणांना बँकेने क्लार्क पदाची नियुक्ती पत्रे दिली. बँकेचे अध्यक्ष व ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली संचालक मंडळाने घेतलेल्या या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड झाली. मंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते बँकेच्या प्रांगणात झालेल्या एका खास कार्यक्रमात या नियुक्ती पत्रांचे वाटप झाले.
     यावेळी बोलताना अध्यक्ष हसन  मुश्रीफ म्हणाले, दहा वर्षापूर्वी कंत्राटी शिपाई म्हणून सेवेत रुजू झालेल्या या कर्मचाऱ्यांचा पगार पाहून आम्हालाही लाज वाटायची. दोन वर्षांपूर्वी त्यांना शिपाई पदावर कायम सेवेत घेतली होते. त्यातील पदवीधरांची क्लार्क म्हणून नियुक्ती व्हावी, अशी त्यांची मागणी होती.
      ते पुढे म्हणाले , बँकेवर पाच वर्षापासून असलेल्या संचालक मंडळाच्या आधीची नऊ वर्ष प्रशासकाची कारकीर्द होती. बँकेवर लागलेला तो एक काळाकुट्ट डाग होता. पाच वर्षांपूर्वी मोठ्या विश्वासाने या बँकेचे नेतृत्व माझ्याकडे दिले आणि संचालक मंडळाने ठरविल्यानुसार राज्यातच नव्हे तर सबंध देशात ही बँक अग्रेसर आणली. कर्मचाऱ्यांचे जेवढे निर्णय प्रलंबित होते, ते सर्व निकालात काढले. कर्मचाऱ्यांनीही अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जिद्दीने काम केले. त्यातूनच बँकेने ६००० कोटी ठेवींचा टप्पा ओलांडला.
      यावेळी संचालक अनिल पाटील, आर. के. पोवार, बाबासाहेब पाटील – आसुर्लेकर, प्रताप उर्फ भैय्या माने, असिफ फरास, संतोष पाटील, रणजितसिंह पाटील, बी.आर. पाटील, ए. बी. परुळेकर, भगवानराव पाटील आदी उपस्थित होते.
   स्वागत व प्रास्ताविक मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ए.बी. माने यांनी तर सूत्रसंचालन प्रमोद व्हराबळे यांनी केले. आभार गोरख शिंदे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *