कोल्हापूर • (जिल्हा माहिती कार्यालय)
महा आवास अभियान – ग्रामीण अंतर्गत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झालेल्या ई-गृहप्रवेश कार्यक्रमात स्वतःच्या घरात प्रवेश करणाऱ्या लाभार्थ्यांना मनापासून शुभेच्छा व्यक्त करतानाच, मिळालेले घर कोरोना मुक्त ठेवावे, असा संदेश मुख्यमंत्र्यांनी मुंबई येथील मुख्य कार्यक्रमात दिला. हा क्रार्यक्रम एकाच वेळेला संपुर्ण राज्यात संपन्न झाला.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयात ( NIC ) हा कार्यक्रम ऑनलाईन झाला. यावेळेस जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक रवि शिवदास यांच्या हस्ते जिल्ह्यातील चार लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात त्यांच्या हक्काच्या घरकुलाच्या चावीचे वितरण करण्यात आले.
यामध्ये करवीर तालुक्यातील मौजे पासोर्डे येथील श्रीमती वंदना कांबळे , वसगडे येथील प्रकाश गायकवाड, वाशीतील श्रीमती तारूबाई दत्तू पाटील आणि नागरवाडी येथील श्रीमती संगिता गायकवाड यांना यावेळी घरकुलाची चावी प्रदान करण्यात आली.
कोल्हापूर जिल्ह्यात या अभियानातंर्गत सुमारे २ हजार ७५७ घरे तयार झाली आहेत. ऑनलाईन प्रणालीव्दारे संपन्न झालेल्या या कार्यक्रमामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदच्या स्तरावर या कार्यक्रमांतर्गत प्रधानमंत्री आवास योजना आणि रमाई आवास योजनेतील प्रत्येकी दोन -दोन लाभार्थ्यांना घरकुलाची चावी देण्यात आली. या प्रसंगी ज्ञानदेव मडके, राजेंद्र जाधव, माया सुर्वे, चंद्रकांत पाटील, राजेंद्र कवडे आदी उपस्थित होते.