कोल्हापूर • प्रतिनिधी केएसए चषक स्पर्धेत बुधवारी झालेल्या सामन्यात खंडोबा तालीम मंडळ (अ)ने फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळवर तर संयुक्त जुना बुधवार पेठने झुंजार क्लबवर विजय मिळवला. या विजयामुळे खंडोबा (अ) आणि संयुक्त जुना बुधवारच्या गुणतक्त्यात प्रत्येकी ३ गुणांची नोंद झाली. छत्रपती शाहू स्टेडियमवर झालेल्या सामन्यात खंडोबा आणि फुलेवाडी संघाच्या खेळाडूंनी सुरुवातीला चाली रचल्या पण समन्वयाअभावी कोणालाही गोल करण्यात यश आले नाही. एका चढाईदरम्यान फुलेवाडीकडून खंडोबा (अ) च्या खेळाडूस गोलक्षेत्रात अवैधरित्या रोखल्याने मुख्य पंचानी पेनल्टी किक दिली. त्यावर प्रभू पोवारने अचूक गोल करून २५व्या मिनिटास खंडोबास आघाडी मिळवून दिली. खोलीची परतफेड करण्यासाठी फुलेवाडीच्या निलेश खापरे, तेजस जाधव, चंदन गवळी यांनी वेगवान चढाया केल्या, त्या अयशस्वी ठरल्या. उत्तरार्धात फुलेवाडी संघाच्या निलेश खापरे, तेजस जाधव गोल नोंदवण्यासाठी अटोकाट प्रयत्न केले.एका चढाईत तेजस जाधवला गोलक्षेत्रात अवैधरित्या रोखल्याने पेनल्टी देण्यात आली. रोहित मंडलिकने मारलेल्या फटक्यावर चेंडू गोलरक्षक आकाश मेस्त्रीने रोखून बाहेर काढला. त्यावेळी परत आलेल्या चेंडूवर गोल करण्याची अत्यंत सोपी संधी रोहितने पुन्हा गमावली. खंडोबाकडून अजीज मोमीन, श्रीधर परब, संकेत मेढे यांनी गोलची आघाडी वाढवण्यासाठी प्रयत्न केले. अखेर जादा वेळेत झालेल्या चढाईत संकेत मेढेने गोल नोंदवून संघाला २-०ने विजय मिळवून दिला. तत्पूर्वी झालेल्या पहिल्या सामन्यात संयुक्त जुना बुधवार पेठने झुंजार क्लबवर ३ विरूद्ध १ गोलने विजय संपादन केला. पूर्वार्धात जुना बुधवारच्या अभिषेक भोपळेने ३४व्या मिनिटास गोल नोंदवला. उत्तरार्धात रोहन कांबळेने ४५व्या मिनिटास गोल करून आघाडी २-० अशी केली. सामन्यातील पाच मिनिटांच्या जादा वेळेत झुंजार क्लबच्या जय मुळीकने गोल नोंदवला. त्यानंतर लगेचच जुना बुधवारच्या रविराज भोसलेने गोल करून विजयावर शिक्कामोर्तब केले. पुढील सामने….. • दि.२४- पोलिस संघ – ऋणमुक्तेश्वर पीटीएम (अ) – दिलबहार • दि.२५- पीटीएम (ब) – उत्तरेश्वर शिवाजी – बालगोपाल • दि.२६- खंडोबा (ब) – झुंजार क्लब प्रॅक्टीस – खंडोबा (अ) • दि.२७- जुना बुधवार – सम्राटनगर स्पोर्टस फुलेवाडी – बीजीएम स्पोर्टस • दि.२८- पोलिस संघ – उत्तरेश्वर पीटीएम (अ) – बालगोपाल • १ मार्च- पीटीएम (ब) – ऋणमुक्तेश्वर शिवाजी – दिलबहार ——————————————————- ReplyForward