‘खंडोबा’ची विजयी सलामी

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
      संकेत मेढेने नोंदवलेल्या हॅट्ट्रिकच्या जोरावर खंडोबा तालीम मंडळने कोल्हापूर पोलिस फुटबॉल संघावर ५ विरूध्द १ गोलने मात करून विजयी सलामी दिली. लढवय्या खेळाडू म्हणून पोलिस संघाच्या अजित पोवारला सातारा जिल्ह्याचे क्रीडा अधिकारी राजेंद्र अतनूर यांच्या हस्ते राजर्षी शाहू महाराज यांची प्रतिमा देऊन गौरविण्यात आले.
      लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी कृतज्ञता पर्वनिमित्त जिल्हा प्रशासन व जिल्हा क्रीडा अधिकारी कोल्हापूर द्वारा आयोजित राजर्षी छत्रपती शाहू महाराज चषक फुटबॉल स्पर्धेचे उदघाटन जिल्हा पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या हस्ते आणि ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनच्या महिला समिती सदस्य व विफाच्या महिला फुटबॉल समिती चेअरमन सौ. मधुरिमाराजे छत्रपती यांच्या अध्यक्षतेखाली झाले. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रशेखर साखरे, आंतरराष्ट्रीय नेमबाज सचिन चव्हाण, केएसएचे राजेंद्र दळवी, नितीन जाधव, संभाजी मांगोरे – पाटील, पैलवान बाबा राजेमहाडिक, सुधाकर जमादार, उदय पवार, प्रा.अमर सामने, किरण साळोखे, प्रदीप साळोखे, श्रीनिवास जाधव, धनंजय कुरणे, किरण भांबुरे, अमित शिंत्रे, शिवाजी पाटील आदी उपस्थित होते.
      छत्रपती शाहू स्टेडियमवर सोमवारी खंडोबा आणि कोल्हापूर पोलिस संघामध्ये झालेल्या उदघाटनाच्या सामन्यात खंडोबाने ५-१ने एकतर्फी विजय मिळवला. त्यांच्या संकेत मेढेने स्पर्धेत पहिली हॅट्ट्रिक नोंदवण्याचा मान मिळवला.
      पूर्वार्धात संकेत मेढेने १२व्या मिनिटाला गोल नोंदवून संघाला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर झालेल्या चढाईत कुणाल दळवीने ३९व्या मिनिटास गोल करून आघाडी २-० केली.
       उत्तरार्धात प्रभू पोवारने ५०व्या मिनिटास गोल केल्यावर पोलिस संघाच्या नितीन पोवार याने ५६व्या मिनिटास गोल नोंदवून आघाडी ३-१ अशी केली. उर्वरित वेळेत संकेत मेढेने ७९व्या मिनिटास संघाचा चौथा तर वैयक्तिक दुसरा गोल केला. त्यानंतर जादावेळेत संकेतने हॅट्ट्रिक साधणारा गोल नोंदवून संघाला ५-१ असा एकतर्फी विजय मिळवून दिला. दरम्यान, पोलिस संघाच्या प्रदीप भोसले याला डबल यलो कार्ड झाल्याने मुख्यपंच योगेश हिरेमठ यांनी त्यास रेड कार्ड दाखवून मैदानाबाहेर घालवले. 
               मंगळवारी होणारे सामने …..
• बालगोपाल – सम्राटनगर : सकाळी ८ वा.  
• झुंजार क्लब – बीजीएम : दुपारी २ वा.      
• पाटाकडील – उत्तरेश्वर : दुपारी ४ वाजता. 
——————————————————- 

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!