• संयुक्त जुना बुधवार पेठची सम्राटनगर स्पोर्टसवर मात
कोल्हापूर • प्रतिनिधी
सतेज चषक फुटबॉल स्पर्धेत बुधवारी झालेल्या सामन्यात खंडोबा तालीम मंडळने प्रॅक्टीस क्लबला पराभवाचा धक्का दिला. तसेच संयुक्त जुना बुधवार पेठने सम्राटनगर स्पोर्टसवर मात करून पुढील फेरीत प्रवेश केला.
पाटाकडील तालीम मंडळ व डॉ. डी.वाय. पाटील ग्रुपच्या संयुक्त विद्यमाने आणि कै. पांडबा जाधव व कै. रावसाहेब सरनाईक यांच्या स्मरणार्थ “सतेज चषक – २०२२” या फुटबॉल स्पर्धेतील सामने छत्रपती शाहू स्टेडियमवर सुरू आहेत. दुपारच्या सत्रात झालेल्या सामन्यात बलाढ्य प्रॅक्टीसला खंडोबाने ३-१ ने पराभूत केले. खंडोबाच्या संकेत मेढेने खोलवर चढाई करत गोलक्षेत्राच्या दिशेने जोरदार फटक्यावर मारलेला चेंडू हेडव्दारा बाहेर काढण्याचा महेश पाटीलचा प्रयत्न फसला. चेंडू बाहेर न जाता थेट गोलजाळ्यात शिरला आणि खंडोबाला स्वयंगोलच्या रूपाने २५ व्या मिनिटास आघाडी मिळाली. त्यानंतर प्रॅक्टीसच्या इंद्रजीत चौगुलेने ३५व्या मिनिटास बरोबरी साधणारा गोल केला.
उत्तरार्धात खंडोबाकडून दिग्विजय असनेकर याने ६७व्या मिनिटास गोल नोंदवून संघाला आघाडी मिळवून दिली. गोलची परतफेड करण्यासाठी प्रॅक्टीसच्या सागर चिले, राहुल पाटील, इंद्रजीत चौगुले यांनी केलेल्या प्रयत्नांना यश आले नाही. अखेर जादावेळेत कुणाल दळवीने गोल करून संघाला ३-१ने विजय मिळवून दिला.
तत्पूर्वी झालेल्या सामन्यात पिछाडीवर असलेल्या जुना बुधवार पेठने आघाडी घेत सम्राटनगर स्पोर्टसवर २-१ ने मात केली. सम्राटनगरच्या धीरज क्षीरसागरने पूर्वार्धात २६ व्या मिनिटास नोंदवलेल्या गोलची परतफेड उत्तरार्धात रोहन कांबळेने ६० व्या मिनिटास केली. त्यानंतर रजत जाधवने जादावेळेत गोल नोंदवून संयुक्त जुना बुधवार पेठला महत्वपूर्ण विजय मिळवून दिला.
गुरूवारचे सामने…..
• झुंजार क्लब-पोलिस संघ : सकाळी ८ वा.
• फुलेवाडी – बालगोपाल : दुपारी ४ वाजता.