वसुंधरेचे संरक्षण हे मनुष्य जातीचे संरक्षण: डाॅ.वंदना शिवा
कोल्हापूर • प्रतिनिधी
सकस आणि पाैष्टिक अन्न हेच आपल्या अस्तित्वात असलेल्या आणि भावी पिढीचे रक्षण करु शकते. रसायनयुक्त अन्न हे मनुष्याच्या मुळावर उठणारे असून वेळीच सावध होत वसुंधरेच्या हाकेला प्रतिसाद देत आपण जैविक शैती आणि जैविक अन्न धान्य साखळीकडे वळले पाहिजे, असे मत भारतीय पर्यावरण तज्ज्ञ, स्त्रीवादी पर्यावरण कार्यकर्त्या आणि अन्न सार्वभौमत्वाततच्या पुरस्कर्त्या डाॅ. वंदना शिवा यांनी व्यक्त केले.
पुणे येथे मंगळवारी (दि.१४) १५ व्या किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवास प्रारंभ झाला. या महोत्सवाचे उद्घाटन भारतीय पर्यावरण तज्ज्ञ, स्त्रीवादी पर्यावरण कार्यकर्त्या आणि अन्न सार्वभौमत्वाततच्या पुरस्कर्त्या डाॅ.वंदना शिवा यांच्या हस्ते झाला, त्यावेळी त्या बोलत होत्या. सकस अन्न, समृद्ध निसर्ग आणि आरोग्यपूर्ण समाज ही यंदाच्या महोत्सवाची केंद्रीय संकल्पना आहे.
या उद्घाटन सत्रात डाॅ.शुभलक्ष्मी रेड्डी यांना ग्रीन टिचर आणि शारदा सुब्रमणियन यांना इको जर्नलिस्ट पुरस्काराने सन्मानित केले गेले. स्मृतिचिन्ह, मानपत्र आणि शाल असे या पुरस्कारांचे स्वरुप आहे. यावेळी व्हीडिओ संदेशाव्दारे पुरस्कारार्थीनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी डाॅ. वंदना शिवा म्हणाल्य की, मनुष्यप्राण्याने हव्यासापोटी वसुंधरेचे अतोनात नुकसान केले आहे. अधिकाधिक अन्न उत्पादनाच्या नादात जमिनीचे आरोग्य बिघडवले आहे. रसायनयुक्त शेती केल्याने कमीत कमी वेळात आपण अधिकाधिक उत्पादन मिळवू असा एकेकाळी शेतकऱ्यांचा समज होता. तो समज जैविक शेती करणाऱ्या शैतकऱ्यांनी पुसून टाकला आहे. जैविक शेती करणारा शेतकरी रासायनीक शेती करणाऱ्या शेतकऱ्यापैक्षा दहापट अधिक उत्पादन घेऊ शकतो. मातीपासून तोडण्यापेक्षा मातीशी जोडून शेती कशी करता येईल हे पाहिले पाहिजे. तसेच आपल्या भारतीय खाद्य संस्कतीच्या पंरपरेनुसार आणि आयुर्वेदात सांगितल्यानुसार अन्न उत्पादन आणि अन्न सेवन वर्तन ठेवल्यास आपले सर्वांचेच मानसिक आणि शारीरिक आरोग्य टिकून राहण्यास मदत मिळेल.
डाॅ. वंदना शिवा म्हणाल्या, निसर्ग संवर्धनाचे हे व्रत असून एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे ते सहजरित्या हस्तांतरीत झाले पाहिजे. मुळात अन्न हेच औषध ही आपली भारतीयांची मुळ संकल्पना आहे. आज निसर्गाच्या विरोधात जाऊन आपण नवनवीन आजारांना आमंत्रण दिले आहे. आज कर्करोग, हृदयरोग, मधुमेह, श्वसनाचे विकार आदी आजारांमुळे दिवसाला शेकडो लोक आपल्या प्राणास मुकत आहे.
यावेळी अतुल किर्लोस्कर म्हणाले की, शाश्वत जीवनशैलीसाठी जैविक घटक उपयोगी पडणार आहेत. प्रतिकार शक्तीचे महत्त्व करोना काळात चांगलेच अधोरेखीत झाले असून सकस आहाराद्वारे प्राप्त प्रतिकार शक्तीमुळेच अनेकांचे प्राण वाचले. जोवर मृदाआरोग्य लक्षात घेतले जात नाही तोवर आपल्या समस्यांचे चक्रव्यूह भेदले जाणार नाही. वसुंधरेची सेवा केल्यास वसुंधरा आपणास भरभरून देईल.
या महोत्सवाचे अध्यक्ष माधव चंद्रचूड आणि क्युरेटर डाॅ.गुरुदास नूलकर यांनी मार्गदर्शन केले.
यानंतरच्या सत्रात जैवविविधता संरक्षक स्वप्नील कुंभोजकर आणि केरळमध्ये हत्तींच्या संरक्षण आणि संवर्धना संदर्भात कार्यरत असलेले आणि ट्रंककॉल आणि द वाईल्ड लाईफ फौंडेशनचे संस्थापक आनंद शिंदे यांनी पत्रकारांशी प्रत्यक्ष संवाद साधला. महोत्सवाचे संयोजक वीरेंद्र चित्राव यांनी गप्पांच्या माध्यमातून कुंभोजकर आणि शिंदे यांचे कार्य उलगडले.
——————————————————-