सूर्यकिरणांनी श्री अंबाबाईचे मुखकमल उजळले


कोल्हापूर • प्रतिनिधी
    साडेतीन शक्तिपीठांपैकी एक पूर्ण‌‌‌पीठ असलेल्या करवीरनिवासिनी श्री अंबाबाई – महालक्ष्मी देवीच्या किरणोत्सव सोहळ्यात शेवटच्या दिवशी गुरूवारी सूर्यकिरणे मुखावर  पोहोचली.मावळतीला निघालेली सूर्यकिरणे देवीच्या मुखावर येऊन स्थिरावली.याचवेळी एक ढग काही क्षण आडवा आला. परंतु क्षणार्धात तो ढग बाजूला झाला आणि किरणे देवीच्या मुखावर स्थिरावली अन् मुखकमल उजळून निघाले. त्यानंतर किरणे किरीटावर जाऊन लूप्त झाली.मावळतीला निघालेल्या सोनसळी सूर्यकिरणांनी देवीला अभिषेक घालूनच हा सोहळा पूर्ण झाला.
     दरम्यान, दीपावली पर्वास आजपासून प्रारंभ झाला.आज वसूबारस – गोवत्स द्वादशी असल्याने श्री अंबाबाई – महालक्ष्मीची पूजा त्या अनुषंगाने बांधण्यात आली. कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर मंदिर बंद असल्यामुळे भाविकांना प्रत्यक्ष मंदिरात उपस्थित राहून किरणोत्सव सोहळा पाहता आला नाही.
     श्री अंबाबाई मंदिरात वर्षांतून दोनवेळा किरणोत्सव सोहळा होतो. सूर्याच्या दक्षिणायन आणि उत्तरायणामुळे हा किरणोत्सव होतो. श्री अंबाबाई – महालक्ष्मीची मूर्ती पश्र्चिमाभिमुख आहे. मंदिराचे मुख्य प्रवेशद्वारही पश्चिमेला असल्याने मावळतीला निघालेली सूर्यकिरणे देवीच्या मुखापर्यंत पोहोचतात आणि किरणोत्सव सोहळा पूर्ण होतो.
      यापूर्वी किरणोत्सव सोहळा तीन दिवस असायचा परंतु गेल्या दोन वर्षांपासून तो पाच दिवसांचा करण्यात आला आहे. या वर्षातील किरणोत्सवास रविवारी (दि.८) सुरूवात झाली. पहिल्या दिवशी ढगाळ हवामानामुळे किरणोत्सव झाला नाही. त्यानंतर सोमवारी किरणोत्सवात सूर्यकिरणे देवीच्या गुडघ्यापर्यंत, मंगळवारी कमरेपर्यंत तर बुधवारी खांद्यापर्यंत पोहोचली. गुरूवारी शेवटच्या दिवशी मावळतीला निघालेली सूर्यकिरणे महाद्वारातून गरूड मंडप, गणपती चौक, कासव चौक, पितळी उंबरठा ओलांडून गाभाऱ्यात पोहोचली.
त्यानंतर किरणे देवीच्या चरणांवरून कमरेपर्यंत व मुखावर येऊन स्थिरावली.याचवेळी एक ढग काही क्षण आडवा आला परंतु क्षणार्धात तो ढग बाजूला झाला आणि किरणे देवीच्या मुखावर स्थिरावली अन् मुखकमल उजळून निघाले. सायंकाळी पाच वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनी किरणोत्सव सोहळा पूर्ण झाला.यानंतर घंटानाद होऊन देवीची आरती झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *