कोल्हापूर • प्रतिनिधी
करवीरनिवासिनी श्री अंबाबाई – महालक्ष्मी मंदिरात आज किरणोत्सवात मावळतीला निघालेली सूर्यकिरणे देवीच्या खांद्यापर्यंत पोहोचली आणि डाव्या बाजूस लूप्त झाली.त्यानंतर घंटानाद होऊन देवीची आरती झाली. सायंकाळी पाच वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनी किरणोत्सव सोहळा संपन्न झाला.
श्री अंबाबाई मंदिरात वर्षांतून दोन वेळा किरणोत्सव सोहळा होतो. यापूर्वी सलग तीन दिवस होत असलेला हा सोहळा गेले दोन वर्षे पाच दिवसांचा होत आहे. पहिल्या दिवशी किरणे देवीच्या चरणांवर, दुसऱ्या दिवशी कमरेवर आणि तिसऱ्या दिवशी मुखकमलावर पोहोचून किरणोत्सव पूर्ण होतो.
रविवारी ढगाळ हवामानामुळे किरणोत्सव झाला नाही. सोमवारी मात्र किरणोत्सव झाला. यामध्ये मावळतीला चाललेली सूर्यकिरणे देवीच्या गुडघ्यापर्यंत पोहोचली. मंगळवारीही किरणोत्सव होऊन किरणे कमरेपर्यंत पोहोचली. बुधवारी पश्र्चिमेला असलेल्या महाद्वारातून सूर्यकिरणांनी सायंकाळी पाच वाजून अकरा मिनिटांनी मंदिरात प्रवेश केला.त्यानंतर टप्प्याटप्याने किरणे देवीच्या चरणांवर पोहोचली. किरणे देवीच्या कमरेपर्यंत पोहोचली. त्यानंतर पाच वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनी किरणे देवीच्या खांद्यापर्यंत पोहोचली आणि डाव्या बाजूला लूप्त झाली. त्यानंतर देवीची आरती झाली.