कोल्हापूरात पाच लाखांच्या बक्षिसांची केएम चॅम्पियनशिप फुटबॉल स्पर्धा

Spread the love

• १७ एप्रिलपासून छत्रपती शाहू स्टेडियमवर स्पर्धेचा थरार
कोल्हापूर • प्रतिनिधी
       शिवाजी पेठेतील झुंजार क्लब आणि फॉर्म्युला थ्री रेसर कृष्णराज महाडिक यांच्यावतीने के.एम. चॅम्पियनशिप फुटबॉल स्पर्धा १७ ते २९ एप्रिल या कालावधीत छत्रपती शाहू स्टेडियमवर आयोजित केली आहे. स्पर्धेतील विजेते संघ आणि खेळाडूंना सुमारे पाच लाख रुपयांची बक्षिसे दिली जाणार असल्याची माहिती कृष्णराज महाडिक आणि झुंजार क्लबचे अध्यक्ष योगेश मोहिते यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी अमित साळोखे, प्रतीक साळोखे, इंद्रजित महाडेश्वर, करण जाधव आदी उपस्थित होते.
       स्पर्धेत वरिष्ठ गटातील १४ संघांची चार गटात विभागणी केली. प्रत्येक गटातील एक संघ सुपर लिगसाठी पात्र ठरेल. या चार संघांत सुपरलिगचे सामने होऊन त्यातील सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या दोन संघात विजेतेपदासाठी लढत होईल. भाजपचे प्रदेश प्रवक्ते आणि माजी खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते १७ एप्रिलला दुपारी चार वाजता ऋणमुक्तेश्वर तालीम मंडळ आणि संयुक्त जुना बुधवार पेठ या सामन्याने स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे.
       कोल्हापुरात दर्जेदार फुटबॉल खेळाडू आहेत, पण त्यांना आवश्यक सुविधा आणि मार्गदर्शन मिळत नाही. कोल्हापुरातील फुटबॉल खेळाडूंना दर्जेदार स्पर्धेत खेळण्याचा अनुभव मिळावा, तसेच येणाऱ्या काळात देशभरातील लिग सामने खेळण्यासाठी कोल्हापूरची टीम तयार करावी, या उद्देशाने झुंजार क्लब आणि फॉर्म्युला थ्री रेसर कृष्णराज महाडिक यांनी के.एम. फुटबॉल चषक स्पर्धेचे आयोजन केले आहे.
       २८ एप्रिल रोजी कोल्हापूरातील मुलींचा संघ आणि बेळगाव किंवा मुंबईच्या महिला संघाशी प्रदर्शनीय सामना तसेच कोल्हापुरातील मान्यवर आणि सेलिब्रिटी यांचा प्रदर्शनीय सामना होईल. या सामन्यांमधून जमा होणारी रक्कम दिवंगत फुटबॉल पंच नंदकुमार सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना दिली जाणार आहे.
                        बक्षिसांचे स्वरूप…..
       स्पर्धेतील विजेत्या संघाला २ लाख रुपये व ट्रॉफी तर उपविजेत्या संघास १ लाख रुपये व ट्रॉफी तसेच तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावरील संघांना अनुक्रमे ५० हजार आणि २५ हजार रुपयांसह ट्रॉफी बक्षीस दिली जाणार आहे. त्याशिवाय स्पर्धेतील बेस्ट गोलकिपर, बेस्ट डिफेंडर, बेस्ट मिडफिल्ड, बेस्ट फॉरवर्ड यांनाही टीव्ही, फ्रीज अशी बक्षिसे दिली जाणार आहेत. सामन्यातील उत्कृष्ट खेळाडूंनाही गौरविण्यात येणार आहे. स्पर्धेत एकूण पाच लाख रुपयांची बक्षिसे दिली जाणार आहेत. त्याचबरोबर प्रेक्षकांसाठी रोजच्या सामन्यातील तिकिटांमधून लकी ड्रॉ काढले जाणार असून विजेत्या प्रेक्षकांना आकर्षक भेटवस्तू दिल्या जाणार आहेत.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!