महापालिकेच्या वॉररुममधून आजअखेर १५०० नागरिकांना बेड उपलब्ध


कोल्हापूर • प्रतिनिधी
      महापालिकेच्या वॉर रुममधून शहरातील व ग्रामीण भागातील १५०० नागरिकांना कोव्हीड-१९ साठी बेड उपलब्ध करुन दिले आहेत. यामध्ये  व्हेन्टीलेटर, ऑक्सीजन व नॉन ऑक्सीजन बेड उपलब्ध करुन दिलेले आहेत. खाजगी रुग्णालयांसह कोरोना केअर सेंटरमधील बेड दिले आहेत.
      कोरोनाचा प्रादूर्भाव वाढल्‍याने शहरात रुग्णांची संख्या वाढत आहे. यामुळे रुग्णांना बेड उपलब्ध व्हावेत तसेच बेडसाठी विविध रुग्णालयात फिरायला लागू नये यासाठी महापालिकेच्या प्रशासनाच्यावतीने दि.७ एप्रिलपासून वॉररुमची स्थापना करण्यात आली. शहरातील नागरिकांना सरकारी व खाजगी रुग्णालयातील रिक्त बेडची माहिती येथे २४ तास उपलब्ध होते. महापालिकेच्या स्थायी समिती सभागृह येथे वॉररुम आहे. ०२३१-२५४५४७३ व ०२३१-२५४२६०१ हा टोल फ्री नंबर या सेवेसाठी सुरु केला आहे. या नंबरवर संपर्क केल्यास कोणत्या रुग्णालयामध्ये कोव्हीड-१९ साठी बेड उपलब्ध आहेत याबाबतची सविस्तर माहिती मिळते.
     वॉररुममध्ये २४ तास माहिती देण्यासाठी तीन शिफ्टमध्ये १२   कर्मचारी काम करत आहेत. ही सुविधा कोरोना रुग्णांना फायदेशीर ठरत आहे. एका फोनवर त्यांना शिल्लक बेडची माहिती मिळत आहे. यामुळे वेळेवर उपचार होत असल्याने कोरोना साथ आटोक्यात आणण्यासाठी हा विभाग एक महत्वाची जबाबदारी पाडत आहे. कोल्हापूरसह पुणे, मुंबई, कर्नाटक येथूनही फोन येत आहेत.
    वॉररुमला २ हजार लोकांचे फोन…..
   वॉररुममध्ये आजपर्यंत २ हजार नागरिकांनी व्हेन्टीलेटर, ऑक्सीजन बेड व हॉस्पीटलमध्ये कोव्हीड-१९ साठी बेड उपलब्धतेसाठी संपर्क साधला आहे. यापैकी सरकारी व खाजगी कोवीड रुग्णालयामध्ये तसेच कोवीड काळजी केंद्र यांच्याबद्दल बेड उपलब्धतेची माहिती दिलेली आहे. आजपर्यंत जवळपास १५०० नागरिकांना या वॉररुमच्या माध्यमातून बेड उपलब्ध झालेले आहेत.
    ऑक्सीजन सिलेंडरचाही पुरवठा…..
   महानगरपालिकेने जिल्हाधिकारी यांच्या मदतीने १० साखर कारखान्यांकडून त्यांच्याकडील ८० ऑक्सीजन सिलेंडर आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत अधिगृहित केली आहेत. महापालिकेच्या केएमटी वर्कशॉप येथे ती ठेवली आहेत. खाजगी अथवा सरकारी रुग्णालयांकडील ऑक्सीजनचा साठा कमी पडल्याची माहिती वॉररुमकडे प्राप्त होते. यावेळी तातडीने या दवाखान्यांना त्यांचा साठा येईपर्यंत तात्पुरत्या स्वरुपात के.एम.टी.वर्कशॉपमधील शिल्लक असल्याली ऑक्सीजनची सिलेंडर दिली जातात.
       अशीही सामाजिक बांधीलकी……
     ग्रामीण भागातील एक गरोदर महिला कोरोना पॉझिटिव्ह असल्याने तगला शहरात कोठेही ॲडमिट करुन घेतले जात नव्हते. ती शहरातील एका हॉस्पीटलच्या दारात सकाळी ७ वाजल्यापासून दुपारी १ वाजेपर्यंत गेटवर ॲडमिट होण्यासाठी थांबली होती. परंतु तेथेही ॲडमिट करुन घेतले नाही. त्या महिलेच्या नातेवाईकांनी महापालिकेच्या वॉररुमला बेड पाहिजे असल्याचे कळविले. तातडीने महापालिकेच्या टिमने त्या महिलेला खाजगी रुग्णालयात बेड उपलब्ध करुन दिला. महिलेची प्रसुती होईपर्यंत महापालिकेचे पथक तेथून बाहेर पडले नाही. सध्या महिला कोरोनामुक्त असून तिचे नवजात बाळही सुखरुप आहे.
——

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *