कोल्हापूर – अहमदाबाद विमान सेवेमुळे विकासाला चालना : ललित गांधी

• नवीन विमान सेवेचा उत्साहात प्रारंभ
कोल्हापूर • प्रतिनिधी
     कोल्हापूर-अहमदाबाद या नवीन विमान सेवेमुळे कोल्हापूर व आसपासच्या जिल्ह्यांच्या औद्योगिक व्यापार विषयक व पर्यटन विषयक विकासाला मोठी चालना मिळेल, असे प्रतिपादन महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज  वाहतूक समितीचे चेअरमन ललित गांधी यांनी केले.
     कोल्हापूर- अहमदाबाद विमान सेवेच्या पहिल्या फेरीचा सोमवारी उत्साहात प्रारंभ झाला. खासदार संजय मंडलिक, आम. ऋतुराज पाटील, आम. चंद्रकांत जाधव, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीचे वरिष्ठ उपाध्यक्ष ललित गांधी, विमानतळ संचालक कमल कटारिया, इंडिगोचे व्यवस्थापक विशाल भार्गव, विमानतळ सल्लागार समितीचे सदस्य अमर गांधी, विज्ञान मुंडे, विजय अग्रवाल आदी  मान्यवरांच्या उपस्थितीत विमान सेवेला उत्साहात प्रारंभ करण्यात आला.
नवीन विमान सेवेमध्ये प्रथम प्रवासी बनण्याचा बहुमान ललित गांधी यांना मिळाला. संचालक कमल कुमार कटारिया, विशाल भार्गव यांनी पहिला बोर्डिंग पास ललित गांधी यांना प्रदान केला. सेवेला अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला असून पहिल्या फेरीत ५४ प्रवाशांनी आपली नोंदणी केली होती. हा प्रतिसाद अजूनही वाढणारा असून ही विमानसेवा लवकरात लवकर दररोज सुरू व्हावी अशी अपेक्षाही ललित गांधी यांनी व्यक्त केली.
     खा. संजय मंडलिक यांनी पहिल्या विमान फेरीतील प्रवाशांना शुभेच्छा दिल्या तसेच कोल्हापूर विमानतळाच्या विकासासाठी प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले. आ. चंद्रकांत जाधव व आ. ऋतुराज पाटील यांनी नवीन विमान सेवेला शुभेच्छा देऊन कोल्हापूरच्या विकासासाठी विमानतळाचा विकास लवकरात लवकर व्हावा यासाठी सहकार्य करण्याचे आश्‍वासन दिले.
     यावेळी पहिल्या फेरीतील प्रवाशांपैकी इंदुमती चंद्रकांत ओसवाल यांच्या हस्ते केक कापण्यात आला. नवीन विमानसेवेचा खा. संजय मंडलिक आ. ऋतुराज पाटील, ललित गांधी, कमल कटारिया व विशाल भार्गव यांनी ध्वज प्रदर्शित करून औपचारिक शुभारंभ केला.
———————————————– 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *