कोल्हापूर-अहमदाबाद विमानसेवा २२ फेब्रुवारीपासुन सुरू : ललित गांधी


कोल्हापूर • प्रतिनिधी
      दिर्घकाळापासून प्रलंबित असलेली कोल्हापूर-अहमदाबाद विमानसेवा सुरू होण्यातील सर्व तांत्रिक अडचणी दुर झाल्या असून येत्या २२ फेब्रुवारीपासून इंडिगोतर्फे ही सेवा सुरू होत असल्याची माहिती महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्रीचे हवाई वाहतुक समितीचे चेअरमन ललित गांधी यांनी दिली.
       कोल्हापूर विमानतळाच्या विकासासह नवीन मार्गांचा समावेश करण्याची मागणी सातत्याने होत होती. विशेषतः कोल्हापूर-अहमदाबाद व कोल्हापूर-दिल्ली सेवेसाठी अनेकांचा विशेष आग्रह होता. कोल्हापूरसह महाराष्ट्रातील विविध विमानतळावरून नवीन सेवांच्या प्रश्‍नांसह नियमित विमानसेवांच्या विविध प्रश्‍नांवर चर्चा करण्यासाठी केंद्रीय नागरी उड्डान मंत्री  हरदिपसिंह पुरी यांनी विशेष बैठकीसाठी २० जानेवारी २०२० रोजी ‘महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स’ च्या हवाई वाहतुक समितीला निमंत्रित केले होते.
      या बैठकीत विविध विषयांवर चर्चा होऊन महत्वपूर्ण निर्णय झाले. त्यामध्ये नाम. हरदीपसिंह पुरी यांनी कोल्हापूर-अहमदाबाद व कोल्हापूर-दिल्ली या दोन नवीन मार्गावर सेवा सुरू करण्यास मान्यता दिली होती. मान्यतेनंतर प्रत्यक्ष हवाई सेवा सुरू होण्याच्या मार्गावर असतानाच कोरोना महामारीच्या संकटामुळे देशातील हवाई सेवाच काही काळ बंद राहिली व हे नवीन मार्ग ही प्रलंबित राहिले.
      विमान वाहतुक सेवा पूर्ववत सुरू झाल्यानंतर ‘महाराष्ट्र चेंबरने’ पुन्हा पाठपुरावा सुरू केला होता. सर्व तांत्रिक बाबींची पुर्तता झाल्यानंतर अहमदाबाद विमानतळाच्या मंजुरीसाठी काम प्रलंबित राहिले. ही सेवा सुरू करण्यास मान्यता मिळालेल्या ‘इंडिगो’ च्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी महाराष्ट्र चेंबरचे वरिष्ठ उपाध्यक्ष ललित गांधी यांना या अडचणी दुर करण्यासाठी हस्तक्षेप करण्याची लेखी विनंती केली होती. त्यानंतर पुन्हा केंद्रीय मंत्र्यांच्या हस्तक्षेपानंतर या सर्व अडचणी दुर होऊन आता प्रत्यक्ष हवाई सेवा सुरू होत आहे. ही अत्यंत आनंदाची व कोल्हापूरच्या विकासासाठी महत्वपुर्ण घटना असल्याचे ललित गांधी यांनी सांगितले.
      या सर्व प्रक्रियेमध्ये खासदार संभाजीराजे छत्रपती, खा. संजय मंडलीक, खा. धैर्यशील माने, पालकमंत्री सतेज पाटील, आ. चंद्रकांत जाधव, आ. ॠतुराज पाटील, विमानतळ संचालक कमलकुमार कटारीया या सर्वांचे व विशेषतः एअरपोर्ट ॲथोरीटी ऑफ इंडियाचे चेअरमन अरविंद सिंह यांचे विशेष सहकार्य लाभल्याची माहिती देऊन ललित गांधी यांनी आता कोल्हापूर-दिल्लीसह अन्य मार्गांवरही नवी सेवा सुरू होण्यासाठी सर्वांच्या सहकार्याने प्रयत्नशील असल्याचे सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *