कोल्हापूर • प्रतिनिधी
कोणत्याही संस्थेच्या ध्येय-धोरणाच्या पूर्तीसाठी प्रशिक्षित मनुष्यबळाची आवश्यकता असते. त्या बळावरच संस्थेचे दैनंदिन कामकाज योग्य दिशेने व गतिमानतेने पार पाडले जाऊ शकते. जिल्ह्यातील ११ लक्ष ७२ हजार वीज ग्राहकांना तत्पर व दर्जेदार सेवा पुरविणाऱ्या कोल्हापूर महावितरणच्या यशाचे गमक यातच दडले आहे. महावितरणच्या कोल्हापूर मंडळाचे प्रशिक्षण केंद्र राज्यात अव्वल ठरले आहे.
कोल्हापूर मंडळाने वर्षभराच्या कालावधीत राज्यात सर्वाधिक ७७ प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन केले. अभियंता, मानवसंसाधन, लेखा, तंत्रज्ञ, यंत्रचालक, बाह्यस्रोत कर्मचारी या संवर्गातील ३१०० अधिकारी – कर्मचारी यांना संबंधितांच्या दैनंदिन कामकाजासाठी उपयुक्त ठरणाऱ्या विषयांच्या अनुषंगाने प्रशिक्षित करण्यात आले आहे. प्रशिक्षणात महावितरणची ध्येय धोरणे, नीतिमूल्यांचा अंगिकार, विद्युत सुरक्षा साधनांचा वापर, नेतृत्व विकास, संवादकौशल्य व ग्राहक संवाद, वीज ग्राहकांसाठी महावितरणच्या विविध योजना उदा. कृषी धोरण, सौर योजना इ., ऑनलाईन पोर्टल्स व मोड्युल वापरणे, वीज यंत्रणेची देखभाल-दुरुस्ती, स्मार्ट बिलिंग, कर्मचारी वेतन भत्ते, अनुषंगिक लाभ व दंडात्मक तरतुदी, ताणतणाव मुक्ती इत्यादी विषयांच्या संदर्भात प्रशिक्षण सत्र आयोजित करण्यात आले.
मुख्य अभियंता परेश भागवत, अधीक्षक अभियंता अंकुर कावळे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारी अभियंता (प्रशासन) प्रशांतकुमार मासाळ, उपकार्यकारी अभियंता तथा लघु प्रशिक्षण केंद्र समन्वयक रत्नाकर मोहिते यांनी ही कामगिरी केली. याबद्दल प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांनी कोल्हापूर मंडळाचे कौतुक केले आहे.