![]() |
• महेंद्रसिंग धोनी क्रिकेट अकॅडमीचा शाहूपुरी जिमखाना येथे शुभारंभ
कोल्हापूर • प्रतिनिधी
कोल्हापूरकरांच्या नसानसात जिद्द, कष्ट आणि चिकाटी हे गुण ठासून भरलेले आहेत. खेळाडू घडविण्यासाठी हे गुण निश्चितच महत्त्वाचे ठरतात. अशा खेळाडूंना एम.एस.धोनी क्रिकेट ॲकॅडमीच्या माध्यमातून तंत्रशुद्ध प्रशिक्षण मिळणार आहे. त्यामुळे येथील खेळाडू राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर चमकदार कामगिरी करतील, असा विश्वास भारतीय संघाचा माजी कसोटीपटू सलील अंकोला यांनी व्यक्त केला. धोनी ॲकॅडमीच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते.
भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि उत्कृष्ट फिनिशर अशी ख्याती असलेला एम.एस.धोनी यांने देशातील टॅलेंटला वाव देण्यासाठी क्रिकेट ॲकॅडमीची स्थापना केली आहे. या ॲकॅडमीची महाराष्ट्रातील दुसरी तर पश्चिम महाराष्ट्रातील पहिली शाखा कोल्हापुरातील शाहूपुरी जिमखाना येथे सुरू करण्यात आली. या शाखेच्या उद्घाटन समारंभास भारतीय संघाचा माजी कसोटी क्रिकेटपटू व अभिनेता सलील अंकोला, खासदार संजय मंडलिक यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी उपस्थित मान्यवरांचा विनोद कंबोज, रमेश पुरेकर, संजय शेटे, चेतन चौगुले यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
शतक महोत्सवाच्या उंबरठ्यावर असलेल्या शाहुपुरी जिमखान्याला नव्यानं खेळाडू घडविण्यासाठी एम.एस.धोनी ॲकॅडमीच्या माध्यमातून एक नवी ओळख निर्माण होणार असल्याचे विनोद कांबोज यांनी सांगितले.
१० ते १९ या वयोगटासोबतच सीनियर गटातील दर्जेदार क्रिकेटपटू घडवणे, त्यांना राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर खेळण्यास प्रोत्साहित करणे हे धोनी ॲकॅडमीच ध्येय असल्याचे आणि त्यासाठी अविरत परिश्रम सुरू असल्याचे या ॲकॅडमीचे महाराष्ट्रातील प्रमुख अनिल वाल्हेकर यांनी सांगितले.
शास्त्रोक्त पद्धतीने खेळाडू घडवणे, त्या दृष्टीने ॲकॅडमी चालवण्याचे ध्येय घेऊन उतरलेली ही ॲकॅडमी कोल्हापूरच्या क्रिकेटला निश्चितच उभारी देणारी ठरेल असा विश्वास जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष बाळ पाटणकर यांनी व्यक्त केला.
खेळाडूंच्या अंगी योग्य गुण निर्माण करून दर्जेदार राष्ट्रीय खेळाडू घडवण्याचं ध्येय एम.एस.धोनी ॲकॅडमी आणि चाटे शिक्षण संस्थेच असल्याचं प्रा.भारत खराटे यांनी सांगितले.
कोल्हापूर हा लढवय्यांच्या जिल्हा आहे. क्रिकेटच्या माध्यमातूनही इथं मोठ्या प्रमाणात ताराराणी तयार होतील असा विश्वास एमसीएच्या सदस्या ॲड. कमल सावंत यांनी व्यक्त केला. अभिषेक बोके, माजी क्रिकेटपटू श्याम ओक यांनीही मनोगत व्यक्त केले.
या जिल्ह्यात गुणवंत खेळाडू घडलेत. तसंच शाहूपुरी जिमखान्यानंही दर्जेदार खेळाडू घडवण्यासाठी प्रयत्न केलेत. या परंपरेत एम.एस.धोनी ॲकॅडमी निश्चितच भर घालेल. देशपातळीवरचे दर्जेदार खेळाडू घडतील असा विश्वास खासदार संजय मंडलिक यांनी व्यक्त केला. शाहूपुरी जिमखाना मैदान सुसज्ज करण्याची जबाबदारी स्वीकारत असल्याचे त्यांनी स्पष्ट केलं. यानंतर मान्यवरांच्या हस्ते धोनी क्रिकेट अकॅडमीच्या फलकाच अनावरण करण्यात आलं. तसेच मैदानावर श्रीफळ वाढवून या अकॅडमीचा उद्घाटन झाल्याचं जाहीर करण्यात आले.
यावेळी जिमखान्याचे माजी संचालक कुलभूषण टिक्के, संचालक विजय भोसले अभिजित कापसे, राजेंद्र मिठारी, केतन शाह, शीतल मिठारी, दिवाकर पाटील, अंकुश निपाणीकर तसेच खेळाडू आणि पालक उपस्थित होते