•सोहम,प्रणव,आयुष,शर्विल,वरद,सारंग व विश्वनिल आघाडीवर
कोल्हापूर • प्रतिनिधी
कोल्हापूर जिल्हा खुल्या निवड बुद्धिबळ स्पर्धेला छत्रपती शिवाजी स्टेडियम येथील हॉलवर आज सुरूवात झाली. सोहम, प्रणव, आयुष, शर्विल, वरद, सारंग व विश्वनील यांनी आघाडी घेतली आहे. या स्पर्धेतून दोन बुद्धिबळपटूंची निवड महाराष्ट्र राज्य निवड बुद्धिबळ स्पर्धेसाठी करण्यात येणार आहे.
कोल्हापूर जिल्हा बुद्धिबळ संघटनेने आयोजित केलेल्या या स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीतनंतर अग्रमानांकित सोहम खासबारदार, द्वितीय मानांकित प्रणव पाटील, तृतीय मानांकित आयुष महाजन, चौथा मानांकित शर्विल पाटील, पाचवा मानांकित वरद आठल्ये, सहावा मानांकित सारंग पाटील, आठवा मानांकित सोहम चाळके व नववा मानांकित विश्वनिल पाटील हे आठजण दोन गुणांसह संयुक्तपणे आघाडीवर आहेत.
क्रीडाअधिकारी विकास माने व जेष्ठ बुद्धिबळपटू आणि कोल्हापूर जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे माजी सचिव आनंदराव कुलकर्णी यांच्या हस्ते पटावर चाल करून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी क्रीडाअधिकारी सुधाकर जमादार, आंतरराष्ट्रीय पंच भरत चौगुले, मुख्यपंच मनीष मारुलकर व उत्कर्ष लोमटे इत्यादी उपस्थित होते.