• महापौर चषक फुटबॉल स्पर्धेतील उर्वरित सामने उद्यापासून
कोल्हापूर • प्रतिनिधी
‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर दोन वर्षांपूर्वी (१३ मार्च २०२०) स्थगित करण्यात आलेले महापौर चषक फुटबॉल स्पर्धेतील सामने विनाप्रेक्षक व कोविड-१९ बाबतचे सर्व नियम व अटी यांची पुर्तता करुन ११ ते १३ फेब्रुवारी या कालावधीत घेण्यात येणार आहेत. शुक्रवारी (दि.११) दुपारी ४ वाजता दिलबहार तालीम मंडळ (अ) विरूद्ध फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळ या लढतीने कोल्हापुरातील फुटबॉल सुरू होत आहे. खरंतर, फुटबॉल खेळाडूंसह फुटबॉलशौकीन गेले दोन वर्षे आतुरतेने वाट पाहत असलेल्या फुटबॉल हंगामाला खऱ्या अर्थाने आता सुरूवात होईल.
दरम्यान, केएसए वरिष्ठ गट साखळी फुटबॉल स्पर्धेने दरवर्षी फुटबॉल हंगामाचा प्रारंभ होतो. सन २०२१-२२साठी वरिष्ठ गटातील संघ व खेळाडू यांची नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यामुळे आता सर्वांना नव्या फुटबॉल हंगामाच्या ‘किक ऑफ’सह केएसए लिग स्पर्धेचे वेध लागले आहेत.
कोविड – १९चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नियमांचे पालन करुन स्थगित करण्यात आलेले महापौर चषक स्पर्धेतील सामने छत्रपती शाहू स्टेडियमवर खेळविण्यात येणार आहेत. केएसएने स्पर्धेसाठी मैदानाचे मार्किंग करून सीसीटीव्हीसह सर्व तयारी पूर्ण केली आहे. सदरचे सामने विनाप्रेक्षक असल्यामुळे फुटबॉल प्रेक्षकांसाठी युटयुब चॅनेलच्या VIEWFINDER MEDIA या लिंकवर लाईव्ह दाखविण्यात येणार आहेत.
कोविड-१९ व ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या संदर्भात जाहिर केलेल्या निर्बंधाचे पालन करण्याच्या अटीवरच जिल्हाधिकाऱ्यांनी कोल्हापूर स्पोर्टस असोसिएशन (केएसए)ला या स्पर्धा घेण्याबाबत परवानगी दिली आली आहे. महापौर चषक फुटबॉल स्पर्धेत प्रॅक्टीस फुटबॉल क्लबने अंतिम फेरी मारली आहे. आता उपांत्य फेरीतील दिलबहार तालीम मंडळ (अ) आणि फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळ यांच्यामधील सामना शुक्रवारी (दि.११) होईल. दिलबहार (अ) – फुलेवाडी सामन्यातील विजयी संघाबरोबर रविवारी (दि.१३) प्रॅक्टीस क्लबची विजेतेपदासाठी लढत होईल. दरम्यान, शनिवारी (दि.१२) लोकप्रतिनिधी विरुध्द प्रशासकीय अधिकारी/कर्मचारी यांच्यामध्ये मैत्रीपूर्ण सामना खेळविण्यात येणार आहे.
फुटबॉल खेळाला तसेच खेळाडूंना चालना देण्याकरिता कोल्हापूर महानगरपालिकेच्यावतीने दि. ४ ते १५ मार्च २०२० या कालावधीत महापौर चषक फुटबॉल स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धतील उपांत्यपूर्व सर्व सामने खेळविण्यात आले होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जारी केलेल्या बंदी आदेशामुळे स्पर्धेतील एक उपांत्य सामना, तृतीय क्रमांक सामना व अंतिम सामना दि.१३ मार्च २०२०पासून स्थगित करण्यात आले होते. कोरोनाचा कहर कमी झाल्याने सुधारित आदेश पारित झाले आहेत. त्यानुसार कोविड-१९ संदर्भातील नियम व अटी पाळून महापौर चषक फुटबॉल स्पर्धेतील उर्वरित सामने खेळले जातील.