कोल्हापूर • प्रतिनिधी
मागील वर्षी कोल्हापूर द्राक्ष महोत्सव २०२१चे आयोजन करण्यात आलेले होते. करवीरनगरीतील ग्राहकांनी या महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला होता. यंदाही सांगली जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांसाठी महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ, कोल्हापूर व कृषि उत्पन्न बाजार समिती, सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकरी ते ग्राहक थेट विक्री योजने अंतर्गत कोल्हापूर शहरातील ग्राहकांना उत्तम प्रतीची, ताजी द्राक्ष माफक दरात उपलब्ध व्हावी, म्हणून राजर्षी शाहू स्मारक हॉल, दसरा चौक येथे “कोल्हापूर द्राक्ष महोत्सव – २०२२” चे आयोजन करण्यात आलेले आहे.
या महोत्सवाचे उद्घाटन शुक्रवारी (दि.११) सकाळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या हस्ते व कृषि उत्पन्न बाजार समिती, सांगलीचे सभापती दिनकर पाटील, बाजार समिती सांगलीचे इतर संचालक, तसेच जिल्हा पुरवठा अधिकारी दत्तात्रय कवितके बी. जी. बिराजदार, अमर शिंदे , जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, कोल्हापूर तथा प्रकल्प संचालक ज्ञानदेव वाकुरे, उपसरव्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ, विभागीय कार्यालय, कोल्हापूरचे डॉ.सुभाष घुले व महेश चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.
या द्राक्ष महोत्सवामध्ये कोल्हापूरकरांना अनुष्का, ज्योती, रेडग्लोब, सुपर सोनाक्का, माणिकचमण, कृष्णा सिडलेस, आर.के. सुपर, शरद सिडलेस इत्यादी जातींच्या द्राक्षांची चव चाखायला मिळणार आहे.