• राजर्षी शाहू स्मारक भवन येथे ३० मार्चपर्यंत महोत्सव
कोल्हापूर • प्रतिनिधी
उत्पादक ते ग्राहक थेट विक्री योजनेंतर्गत कृषी उत्पन्न बाजार समिती, सांगली आणि महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आजपासून ‘कोल्हापूर द्राक्ष महोत्सव २०२१’ला प्रारंभ झाला. या महोत्सवचे उद्घाटन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या हस्ते झाले. दसरा चौकातील राजर्षी शाहू स्मारक भवन येथे आजपासून ३० मार्चपर्यंत सकाळी ९ ते रात्री ८ या कालावधीत हा महोत्सव चालणार आहे.
जिल्हाधिकारी श्री. देसाई यांनी फित कापून या महोत्सवाचे उद्घाटन केले. यावेळी महाराष्ट्र कृषी पणन मंडळाचे उप सरव्यवस्थापक सुभाष घुले, जिल्हा पुरवठा अधिकारी दत्तात्रय कवितके, जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे, सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिनकर पाटील, माजी उपसभापती जीवन पाटील, हिंदकेसरी दिनानाथसिंह तसेच अतुल बनसोडे व सचिव महेश चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.
उद्घाटनप्रसंगी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी, अशा महोत्सवांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालास अपेक्षित दर मिळतो व ग्राहकांनासुध्दा चांगल्या प्रतिचा फ्रेश शेतमाल उपलब्ध होण्यास मदत होते. यामुळे विविध शेतमालांसाठी वेगवेगळ्या राज्यात अशा महोत्सवांचे आयोजन पणन विभागामार्फत करणयात यावे अशी अपेक्षा व्यक्त केली.
तसेच जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे यांनी कृषी व पणन विभागाच्या माध्यामातून निश्चितच वेगवेगळ्या महोत्सवाचे आयोजन करण्यात येईल, जेणेकरुन शेतकऱ्यांच्या शेतमालास चांगला दर मिळेल असे सांगितले.
जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे यांनी शहरातील गृहनिर्माण संस्थांनी शेतकऱ्यांच्या शेतमालास थेट विक्रीच्या दृष्टिने पुढे येण्याची आवश्यकता आहे, असे सांगितले. तसेच जिल्हा पुरवठा अधिकारी दत्तात्रय कवितके यांनी पणन मंडळाचा सदरचा उपक्रम हा अत्यंत स्तुत्य असून उत्पादक व ग्राहक यांना एकत्र आणण्याच्या दृष्टिने मोलाचा आहे, असे नमुद केले.
कोव्हिड-१९मुळे शेतकरीवर्गात शेतमाल उत्पादन विक्रीबाबत चिंतेचे वातावरण होते. विशेषत: द्राक्ष बागायतदारांची निर्यात ठप्प्ा होती. त्यामुळे शेतकरी उत्पादकांच्या मालाची थेट ग्राहकांनी विक्री करण्याच्या उद्देशाने अशा महोत्सवांचे आयोजन करण्यात आले, असे सांगून पणन मंडळाचे उपसरव्यवस्थापक सुभाष घुले म्हणाले, गोवा येथेही द्राक्ष महोत्सव भरवण्यात आला होता. ग्राहकांना तसेच शेतकऱ्यांना याचा चांगला लाभ मिळाला. कोल्हापूर येथील महोत्सवातही ग्राहकांनी भेट देवून सहभाग घ्यावा. निर्यातक्षम, चांगल्या प्रतीची द्राक्ष ग्राहकांना थेट उत्पादकांकडून मिळतील. त्यामुळे शेतकऱ्यांनाही चांगला आर्थिक लाभ होईल, असे आवाहनही त्यांनी केले.
कृषी उत्पन्न बाजार समिती, सांगलीचे संचालक जीवन पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले.
महोत्सवास चांगला प्रतिसाद…..
दरम्यान, आजपासून सुरू झालेल्या द्राक्ष महोत्सवास ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. ग्राहकांनी द्राक्षांसह बेदाणे व मनुके खरेदी केली. महोत्सवामध्ये अनुष्का, रेडग्लोब, सुपर सोनाक्का, माणिकचमण, कृष्णा सिडलेस, आर.के.सुपर, शरद सिडलेस आदी जातींची द्राक्षे आहेत. मिरज तालुक्यातील सोनी येथील दिलीप पाटील, प्रतिक लेंगरे या शेतकऱ्यांची जंबो सिडलेस ही द्राक्षे या महोत्सवाची खास आकर्षण ठरली.
———————————————–