क्षयरोग कामकाजामध्ये कोल्हापूर महानगरपालिका राज्यात अव्वल

Spread the love


• महापालिका सलग दोन वर्ष राज्यात अव्वलस्थानी
कोल्हापूर • प्रतिनिधी
      राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम अंतर्गत संचालक, आरोग्य सेवा, पुणे यांनी राज्यातील ३६ जिल्हे आणि २२ महानगरपालिका यांचे क्षयरोग कामकाजाचे मुल्यांकन केले. यामध्ये कोल्हापूर महानगरपालिका २२ महानगरपालिकांमध्ये राज्यामध्ये अव्वल आल्याचे शासनाच्या आरोग्य विभागाने नुकतेच जाहिर केले.  
      याबाबत शासनाच्यावतीने पुणे आरोग्य विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव व आयुक्त डॉ.प्रदीप व्यास, संचालक डॉ.अर्चना पाटील व सहसंचालक कुष्ठरोग व क्षयरोग डॉ.रामजी आडकेकर यांच्या हस्ते गौरव चिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. हा गौरव पुणे येथील यशवंतराव चव्हाण प्रशासन प्रबोधन (यशदा) येथे करण्यात आला. महापालिकेने सल्लग दोन वर्ष राज्यामध्ये आपले अव्वल स्थान कायम राखले आहे.
       मुल्यांकनामध्ये संशयित क्षयरुग्ण शोधकाम, एकूण निदान झालेले क्षयरुग्ण, क्षयरुग्णांची यु.डी.एस.टी तपासणी, क्षयरुग्णांची एच.आय.व्ही. तपासणी, क्षयरुग्णांची डायबेटिस तपासणी, निक्षय पोषण योजना, सहा वर्षाखालील बालकांचे प्रतिबंधात्मक औषधोपचार, क्षयरुग्ण बरे होणेचे प्रमाण, एम.डी.आर.रुग्णाबाबत सर्वांना दिलेले उद्दिष्ट, रुग्ण संख्या, साध्य केलेले उद्दीष्ट यांची टक्केवारी काढण्यात आली. यामध्ये एकूण राज्याच्या क्षयरोग कामकाजाच्या ७५.८५% च्या तुलनेत कोल्हापूर महानगरपालिकेने ८८.४०% इतके उद्दीष्ट पुर्ण केले.
       त्याअनुषंगाने बुधवारी महानगरपालिक क्षयरोग नियंत्रण सोसायटीच्या नियामक मंडळाच्या सभेचे औचित्य साधुन प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांच्या हस्ते, उपायुक्त रविकांत अडसुळ व सहाय्यक आयुक्त संदिप घार्गे यांच्या प्रमुख उपस्थितीत शहर क्षयरोग अधिकारी डॉ. प्रकाश पावरा, वैद्यकीय अधिकारी डॉ.रुपाली दळवी, क्षयरोग विभागाकडील अधिकारी व कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.विलास देशमुख, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. यु. जी. कुंभार उपस्थित होते.
       ही सभा सरकारी आणि खाजगी क्षेत्रातील विविध समितीच्या सदस्यांच्या उपस्थितीमध्ये ताराबाई पार्क येथील निवडणूक कार्यालयात पार पडली. वैद्यकीय अधिकारी डॉ.रुपाली दळवी यांनी क्षयरोग कामकाजाची सविस्तर माहिती स्लाईड शोद्वारे समितीच्या सदस्यांना दिली.
       प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांनी क्षयरोग नियंत्रण कामकाजामध्ये या विभागाने सातत्य राखावे. महापालिकेचे कामकाज राज्यामध्ये असेच अव्वल ठेवावे असे सांगितले. नविन सीबीनॅट मशिन खरेदीकरीता जिल्हा नियोजन समितीकडे तातडीने प्रस्ताव सादर करण्याच्या सुचना डॉ.प्रकाश पावरा यांना दिल्या.
       उपायुक्त रविकांत अडसुळ यांनी निर्देशांक निहाय सविस्तर आढावा घेऊन महापालिकेच्या शाळा आणि महाविद्यालय येथे क्षयरोग जनजागृतीपर विविध उपक्रम राबविण्याच्या सुचना दिल्या.
       शहर क्षयरोग अधिकारी डॉ.प्रकाश पावरा यांनी क्षयरोग विभाग शहरातील सरकारी आणि खाजगी रुग्णालये येथील सर्वच संशयित क्षयरुग्णांसाठी थुंकी नमुने तपासणी, निदान झालेल्या क्षयरुग्णांसाठी सीबीनॅट, ट्र्युनॅट, सीडीएसटी, एक्स-रे, सीटी स्कॅन, ईग्रा व बायप्सी, क्षयरुग्णांसाठी निक्षय पोषण योजना, खाजगी वैद्यकीय व्यवसायिक यांच्यासाठी प्रोत्साहनपर भत्ता इत्यादी सुविधा पूर्णपणे मोफत पुरविली जात असलेचे सांगितले. या मोफत तपासणींचा लाभ संबंधितांनी घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले.
——————————————————- Attachments areaReplyForward

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!