कोल्हापूर सराफ व्यापारी संघ देवस्थान समितीकडे अंबाबाईची मूर्ती सुपूर्द करणार

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
       कोल्हापूर सराफ व्यापारी संघाकडे करवीरनिवासिनी श्री अंबाबाईची अंदाजे ५१ किलो वजनाची चांदीची मूर्ती आहे. ती १ मार्च रोजी विधिवत पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडे सुपूर्द केली जाणार आहे. त्यानिमित्ताने अंबाबाई मंदिर परिसरात शोभायात्रा काढण्यात येणार आहे. या निमित्ताने रांगोळ्यांसह आकर्षक रोषणाईही केली जाणार आहे, अशी माहिती कोल्हापूर सराफ व्यापारी संघाचे अध्यक्ष कुलदीप गायकवाड यांनी दिली. यावेळी उपाध्यक्ष जितेंद्र राठोड, सचिव अनिल पोतदार (हुपरीकर), संजय जैन, संचालक सुहास जाधव, सुरेश गायकवाड, सुरेंद्र पुरवंत, अमोल ढणाल, सुरेश राठोड आदी उपस्थित होते.
       करवीर निवासिनी श्री अंबाबाई मूर्ती प्रदानप्रसंगी काढण्यात येणाऱ्या शोभायात्रेत नागरिकांसह तालीम, मंडळे, संघटनांनी मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा, असे आवाहन कोल्हापूर सराफ व्यापारी संघाचे अध्यक्ष कुलदीप गायकवाड यांनी केले आहे.
      यासंदर्भात अधिक माहिती देताना श्री. गायकवाड म्हणाले, सराफ संघाकडे ३१ वर्षांपासून करवीर निवासिनी अंबाबाईची चांदीची मूर्ती आहे. दरम्यान, अंबाबाई मंदिरात असणाऱ्या मूळ मूर्तीचीही अभिषेकमुळे झीज होत आहे. याच कारणासाठी आम्ही ही मूर्ती देण्याचा सर्व संमतीने निर्णय घेतला. त्यासाठी रीतसर जिल्हाधिकारी कार्यालय आणि पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडून परवानगी घेऊन मूर्ती प्रदान करीत आहोत. यासाठी जिल्हाधिकारी राहुल रेखावार आणि देवस्थान समिती सचिव शिवराज नाईकवडे यांचे बहुमोल सहकार्य मिळाले.
      ते म्हणाले, १मार्च रोजी सायंकाळी पाच वाजता अंबाबाई मंदिर परिसरात मूर्तीसह शोभायात्रा निघेल. यावेळी रांगोळी, आकर्षक रोषणाईबरोबर वाद्यांचा गजरही असेल. यामध्ये नागरिकांसह तालीम, मंडळे, संघटनांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन उत्सवाची शोभा वाढवावी.
                           ४ मार्चला महायज्ञ….. 
      श्री अंबाबाई मूर्ती देवस्थान समितीकडे सुपूर्द केल्यानंतर गरुड मंडपामध्ये मूर्ती ठेवण्यात येईल. तिचा वापर दैनंदिन पूजा आणि अभिषेकसाठी केला जाणार आहे. त्यापूर्वी ४ मार्च रोजी मंदिरात मूर्तीला अभिषेक केला जाणार आहे. त्याचबरोबर महायज्ञाचेही आयोजन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!