टोलमुक्तीच्या एकाच मुद्द्यामुळे कोल्हापूरकर भाजपाला मतदान करतील: चंद्रकांतदादा पाटील

Spread the love

• रंकाळा तलाव परिसरात ‘चाय पे चर्चा’द्वारे नागरिकांशी संवाद
कोल्हापूर • प्रतिनिधी
     कोल्हापूरच्या जनतेला ३० वर्षे टोलचा त्रास सहन करावा लागणार होता. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना, क्षणाचाही विलंब न करता टोलमुक्तीसाठी ४७३ कोटी रुपये निधी मंजूर करुन कोल्हापूरकर जनतेला दिलासा दिला. त्यामुळे टोलमुक्तीच्या एकाच मुद्द्यावर उत्तर कोल्हापूरकर भाजपाला मतदान करतील, असा विश्वास भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केला.
      कोल्हापूर उत्तर विधानसभा पोट निवडणुकीत भाजपा उमेदवार सत्यजित उर्फ नाना कदम यांच्या प्रचारार्थ शहर भाजपाच्यावतीने रंकाळा तलाव परिसरात चाय पे चर्चाचे आयोजन केले होते. यामध्ये भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी सहभाग घेऊन, मॉर्निंग वॉकसाठी येणाऱ्या नागरिकांशी संवाद साधला.
      यावेळी माजी खासदार धनंजय महाडिक, जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, अशोक देसाई, सुहास आण्णा लटोरे, सुदर्शन पाटील, प्रताप देसाई, किरण नकाते उपस्थित होते.
     आ. चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, कोल्हापूरमध्ये टोलचा प्रश्न अतिशय त्रासदायक ठरला होता. विद्यमान पालकमंत्री त्याकाळी हा प्रश्न सोडविण्याऐवजी फक्त आंदोलन करुन दिशाभूल करत होते. पण देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना, क्षणाचाही विलंब न करता, ४७३ कोटी रुपये निधी मंजूर करुन, टोलच्या त्रासापासून कोल्हापुरकरांना मुक्त केले. त्यामुळे टोलमुक्तीच्या एकाच मुद्द्यावर कोल्हापूरकर जनता भाजपाला नक्कीच मतदान करतील.
      ते पुढे म्हणाले की, सत्यजित कदम हे कोल्हापूरच्या राजकारण आणि समाजकारणातील अतिशय जुनं घराणं आहे. त्यांचे वडील शिवाजीराव कदम यांनी महापौर म्हणूनही कोल्हापूरकरांची सेवा केली आहे. त्यामुळे सत्यजित कदम हे देखील सामाजिक कामामुळे जनतेशी जोडले गेलेले आहेत.
      माजी खा. धनंजय महाडिक म्हणाले की, ज्याप्रमाणे आपण आरोग्याची काळजी घेतो, त्याचप्रमाणे उत्तर कोल्हापूरकर जनतेने शहराच्या काळजीसाठी भाजपाच्या पाठिशी उभे राहिले पाहिजे. २०१९ च्या महापुरानंतर देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांतदादांमुळे नुकसानभरपाईचे पैसे तातडीने मिळाले. पण २०२१ च्या महापुरातील नुकसानीचे पैसे अजूनही कोल्हापूरकरांना मिळाले नाहीत. काही शेतकऱ्यांचे तर प्रचंड नुकसान झाले. पण त्यांना नुकसान भरपाई म्हणून हेक्टरी १३५, ११६ रुपये देऊन, क्रूर थट्टा केली आहे. त्यामुळे उत्तर कोल्हापूरमधील जनता पोटनिवडणुकीत विरोधकांना त्यांची योग्य जागा दाखवून देतील.
——————————————————- 

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!