कोल्हापूर • (जिमाका)
कोरोना सर्वेक्षणाच्या धर्तीवर क्षयरुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींच्या निदानासाठी सर्वेक्षण करण्याचे नियोजन करावे. यासाठी प्रथम गेल्या ३ वर्षातील जास्त रुग्णसंख्या असलेल्या गावांची सर्वेक्षणासाठी निवड करावी. खासगी क्षयरुग्णांच्या औषधे-विक्रीबाबत अन्न व औषध प्रशासन विभागाने सनियंत्रण ठेवावे व याबाबतची नोंद ठेऊन ती माहिती आरोग्य विभागास वेळोवेळी द्यावी, अशा सूचना जिल्हास्तरीय टिबी फोरम व टी.बी. कोमोर्बिडीटीच्या बैठकीत फोरमचे अध्यक्ष जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिल्या. कोल्हापूर जिल्हा क्षयमुक्त करण्यासाठी शासकीय, निमशासकीय व खाजगी वैद्यकीय व्यावसायिक एकत्र काम करत आहेत यातूनच कोल्हापुरची क्षयमुक्तीकडे आश्वासक वाटचाल सुरु आहे, असेही ते यावेळी म्हणाले.
टिबी फोरम व टी.बी.कोमोर्बिडीटीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील राजर्षी शाहु सभागृहात पार पडली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण तसेच समिती सदस्य उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. रेखावार म्हणाले, निक्षय पोषण योजनेतंर्गत क्षयरुग्णांना दरमहा ५०० रुपये उपचार पूर्ण होईपर्यंत मानधन व खासगी वैद्यकीय व्यावसायिक, लॅब, केमिस्ट यांनी क्षयरुग्णांची नोंद केल्यास ५०० रुपये मानधन तसेच क्षयरुग्णांचा उपचार पूर्ण करुन घेतल्यास पुन्हा ५०० रुपये मानधन आणि उपचार सहाय्यकास क्षयरुग्णांमागे १ हजार रुपये मानधन इ. सुविधा देण्यात येत आहेत. क्षयरुग्णांची नोंद न केल्यास खासगी वैद्यकीय व्यावसायिकांना भारतीय दंड संहिता (१८६० च्या ४५) च्या कलम २६९ आणि २७० च्या अतंर्गत शिक्षा होऊ शकते. रुग्णांसाठी सीबीनेट, एक्सरेची मोफत तपासणी व मोफत उपचार सुरु आहे. या व अशा सर्व योजना, निदान सुविधा, उपचाराबाबतची सर्व माहिती सर्वांना पोहोचण्यासाठी वैद्यकीय व्यावसायिक, लॅब, केमिस्ट यांच्यासाठी १५ नोव्हेंबर पर्यंत फेसबुक लाईव्ह सेशनचे आयोजन करावे. तसेच दर दिड महिन्यांनी याबाबत प्रसिद्धी देण्यात यावी. वैद्यकीय व्यावसायिकांची वेळोवेळी कार्यशाळा घेण्यात यावी, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
सी.पी.आर.-जिल्हा क्षयरोग विभागासाठी जैवसुरक्षा कॅबिनेट व एम.डी.आर. वॉर्ड तयार करण्यासाठी अतिरिक्त निधीसाठी त्वरित मागणी अहवाल सादर करण्याचे आदेशही त्यांनी दिले.
मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण म्हणाले, खासगी वैद्यकीय व्यावसायिक, लॅब, केमिस्ट यांचा व्हॉट्सॲप ग्रुप तयार करण्यात यावा व त्यामधून वेळोवेळी सर्व योजना, निदान सुविधा, उपचाराबाबतची माहिती त्यांना पुरवावी व एम.डी.आर. रुग्णांच्या उपचार, निदानासाठी दुर्गम तालुक्यावर जास्त लक्ष केंद्रित करावे, अशा सूचना दिल्या.
जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.उषा कुंभार यांनी या फोरम समितीची संरचना, उद्दिष्टे, कार्य, उद्देश याबाबत सविस्तर माहिती दिली. त्यांनी संगणकीय सादरीकरणाच्या माध्यमातून क्षयरोग कार्यक्रमाचे उद्दिष्ट, साध्य, मनुष्यबळ, समाजिक दायित्व (सी.एस.आर.) अंतर्गत क्षयरुग्णांसाठी मिळालेले साहित्य, सुविधा, एस.टी.पास व इतर सुविधा, कोल्हापूर ग्रामीणला मिळालेल्या सिल्वर मेडल सर्टीफीकेशन इत्यादी बाबत तसेच सुप्त क्षयरोग संसर्ग (एल.टी.बी.आय.) टीबी प्रतिबंधक उपचार (टी.पी.टी.) या नवीन प्रणालीबाबत माहिती त्यांनी दिली.
टी.बी.कोमोर्बिडीटीमधील टीबी-एचआयव्ही, टीबी- डायबीटीज बाबतही त्यांनी माहिती दिली. दोन आठवड्यापेक्षा जास्त खोकला, ताप वजनात घट, थुंकीवाटे रक्त येणे, मानेवर गाठ असणाऱ्या व्यक्तींनी १५ ते २५ नोव्हेंबर या कालावधीत होणाऱ्या क्षयरुग्णांच्या शोध मोहिमेत मोफत तपासणी करून घेण्याचे आवाहन त्यांनी केले.
डॉ.अनिता सैबन्नावर यांनी क्षयरोगावर लस तयार करण्याबाबत शासनामार्फत संशोधन सुरु असल्याचे सांगितले. डॉ. मानसी कदम यांनी आभार मानले.
यावेळी रा.शा.छ.शा.मेडिकल कॉलेजचे विभाग प्रमुख डॉ.अनिता सैबन्नावर, डॉ.मनीष पाटील, के.एम.ए.च्या अध्यक्ष डॉ. आशा जाधव, शहर क्षयरोग अधिकारी डॉ.रुपाली दळवी, ॲड. गौरी पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ. मानसी कदम, डॉ.विनायक भोई, डॉ. प्रल्हाद देवकर, दिपा शिपूरकर आदी समिती सदस्य उपस्थित होते.
——————————————————-