जयसिंगपुरात मागासवर्गीय मुलींसाठींचे वसतिगृह उभारण्यास मान्यता

Spread the love


कोल्हापूर • (जिमाका)
      शिरोळ तालुक्यासाठी मध्यवर्ती असलेल्या जयसिंगपूर शहरात अनेक शैक्षणिक संस्था आहेत. तालुक्याच्या गावागावातून विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षणानिमित्त शहरात येत असतात यामध्ये मागासवर्गीय विद्यार्थी विद्यार्थिनींचे प्रमाण लक्षणीय आहे. या मुलींसाठी शासकीय वसतीगृहाची इमारत उपलब्ध नव्हती. मुलींसाठी नवीन शासकीय वसतीगृहाची इमारत मंजूर व्हावी, अशी मागणी आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि समाजकल्याण मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे केली होती, त्याचाच भाग म्हणून जयसिंगपूरमध्ये मागासवर्गीय मुलींच्यासाठी नवीन शासकीय वसतीगृह मान्यता मिळाली असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी मुंबई येथे दिली.
      समाजकल्याण विभागाच्या विभागीय आयुक्तांमार्फत जयसिंगपुरात १०० विद्यार्थिनी क्षमता असलेले १६ कोटी ५५ लाख रुपये खर्चाच्या  वसतीगृह इमारतीचे अंदाजपत्रक शासनास सादर केले होते, शासनाने पहिल्या टप्प्यात ७५ विद्यार्थिनींसाठी दहा कोटी २१ लाखांचा निधी मंजूर केला असल्याची माहिती राज्यमंत्री यड्रावकर यांनी यावेळी दिली.
उर्वरित निधी प्राप्त होण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा केला जाईल असेही नामदार यड्रावकर यांनी सांगितले आहे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजितदादा पवार व समाजकल्याण मंत्री धनंजय मुंडे यांनी मागासवर्गीय विद्यार्थिनींच्या शासकीय वसतीगृहास मान्यता दिल्याबद्दल राज्यमंत्री यड्रावकर यांनी त्यांचे आभार व्यक्त केले.
———————————————– 

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!