महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स’च्या अध्यक्षपदी ललित गांधी यांची निवड

Spread the love

• उर्वरीत ६५ जागांसाठी १२६ उमेदवार रिंगणात
कोल्हापूर • प्रतिनिधी
     महाराष्ट्राच्या व्यापार-उद्योग क्षेत्राची शिखर संस्था म्हणून गेल्या ९५ वर्षापासुन कार्यरत असलेल्या महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अ‍ॅण्ड ॲग्रीकल्चरच्या अध्यक्षपदी ललित गांधी यांची बिनविरोध निवड झाली आहे.
     महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या द्विवार्षिक निवडणुकीची प्रक्रीया सुरू असून ९ व १० नोव्हेंबरच्या छाननी प्रक्रियेनंतर ११ नोव्हेंबर रोजी निवडणुक अधिकारी सागर नागरे यांनी वैध उमेदवारांची यादी जाहीर केली. ‘अध्यक्ष’ पदासाठी राज्यातून एकच उमेदवारी अर्ज दाखल झाला होता, त्यामुळे ललित गांधी यांची बिनविरोध निवड निश्‍चित झाली.
      महाराष्ट्र चेंबरच्या व्यवस्थापन समितीच्या सहा जागा व गव्हर्निंग  काऊन्सीलच्या ९२ जागांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू असून, ललित गांधी यांच्या नेतृत्वाखालील दोन उपाध्यक्ष व गव्हर्निंग काऊन्सील वरील २७ सदस्य बिनविरोध निवडून आले असून व्यवस्थापन समितीच्या उर्वरीत तीन जागांसाठी ९ उमेदवार रिंगणात आहेत. गव्हर्निंग काऊन्सीलच्या उर्वरीत ६२ जागांसाठी ११७ उमेदवार रिंगणात आहेत. १५ डिसेंबर ही अर्ज माघारीची शेवटची तारीख असून या तारखेनंतर उर्वरीत जागांवरील निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल.
      ललित गांधी गेल्या २१ वर्षापासून महाराष्ट्र चेंबरमध्ये कार्यरत आहेत. गव्हर्निंग काऊन्सील सदस्य, उपाध्यक्ष, वरिष्ठ उपाध्यक्ष अशा विविध पदांवर त्यांनी कार्य केले आहे. ते विविध राज्य व राष्ट्रीय स्तरावरील शिखर संस्थांवर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करीत आहेत.
      या निवडीनंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना ललित गांधी म्हणाले की, शतक महोत्सवाकडेे वाटचाल करणार्‍या राज्याच्या शिखर संस्थेचे नेतृत्व करण्याची संधी मिळणे ही दुर्मिळ व महत्वपुर्ण घटना आहे. महाराष्ट्र चेंबरच्या माध्यमातून संपुर्ण महाराष्ट्रासह चेंबरच्या कार्यक्षेत्रातील सर्व भागांतील व्यापार-उद्योग-कृषी व कृषि पुरक उद्योग व पायाभूत सुविधांच्या विकासासाठी आपण कार्यरत राहू. छोट्यात छोट्या व्यापारी – उद्योजकांचे प्रश्‍नही प्राधान्याने हाती घेऊ तसेच महाराष्ट्राला संपुर्ण देशात पुन्हा एक नंबरवर आणण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्याबरोबर कार्य करून यश मिळवू.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!